आईचा देहदान करून जपले सामाजिक दायित्व
कारंजा : देहदान हेच श्रेष्ठ दान हा संतांचा संदेश मनाशी बाळगून श्री गुरुदेव प्रचारक, कारंजा तालुक्यातील गोंधणी येथील दिव्यांग सामाजिक प्रबोधनकार लिलाधार धर्माजी चोपडे महाराज यांनी आपल्या आईचा देहदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
लिलाधार महाराज यांनी आपल्या आईच्या निधनानंतर देहदान करण्याचा संकल्प पूर्वीच केला होता आणि त्या अनुषंगाने नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात देहदानाची नोंदही केली होती. त्यांच्या मातोश्री गिरीजा धर्माजी चोपडे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी केलेल्या निश्चयानुसार, तात्काळ रुग्णालय प्रशासनाला माहिती देऊन मातोश्रींचे पार्थिव वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी सुपूर्द करण्यात आले.
श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करत, भजन, टाळ-मृदुंगाच्या गजरात अत्यंत श्रद्धा व शांततेच्या वातावरणात मातोश्रींचे पार्थिव दवाखान्याच्या स्वाधीन करण्यात आले. सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेमध्ये देहदानाबाबत जनजागृती करणाऱ्या लिलाधार महाराज यांनी आपल्या कृतीतून कथनी आणि करणीची सांगड घालत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
![]()
मातोश्रींचे पार्थिव वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच संशोधनासाठी उपयोगात आणले जाणार आहे. यामुळे मानवी शरीराचा सखोल अभ्यास, शस्त्रक्रियांचा सराव तसेच नव्या उपचार पद्धतींचा विकास करण्यास मदत होणार आहे. मृत्यूनंतर शरीराची विटंबना होते, हा गैरसमज दूर करून देहदानातून समाजासाठी किती मोलाचे योगदान देता येते, हे या घटनेतून अधोरेखित होते.
आईचा देहदान करून सामाजिक दायित्व जपल्याबद्दल लिलाधार धर्माजी चोपडे महाराज यांचे संपूर्ण कारंजा तालुक्यातून कौतुक व आदर व्यक्त करण्यात येत आहे.