मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. आमदार निवास मधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या संबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितले की, रात्री दहा वाजता माझी जेवणाची वेळ असते. त्यामुळे काल रात्री मी नऊ-साडेनऊ वाजता वरण भात आणि पोळी याची आॅर्डर दिली होती. त्यात भातासोबत वरण मिक्स करुन मी पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटले वरण मध्ये चिंच असेल, म्हणून मी पोळी सोबत दुसरा घास घेतला असता मला वोमिटिंग झाली. त्यामुळे मी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते.
यापूर्वी देखील कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा मला निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी कॅन्टीन मालकाला समज दिली होती. महाराष्ट्रातील पाच ते दहा हजार लोक रोज या कॅन्टीन मध्ये जेवण करतात. या सर्वांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. जेवण अतिशय घाणेरडे असल्याने राग अनावर
सडलेले आणि कुजलेले जेवण महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांना देऊन त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. जेवण अतिशय घाणेरडे असल्यामुळे माझा राग अनावर झाला. त्यामुळे माझा मूळ स्वभाव दिसून आला. अशा शब्दात संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. तक्रार दाखल करणार
आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण योग्यच नाही. हा आमच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. या संदर्भातली तक्रार आपण अन्न व औषध प्रशासन विभागाला देखील करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच आज विधानसभेमध्ये देखील याविषयी आवाज उठवणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.