♦ वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे
नागपूर : वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अंशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
नागपूर परिमंडलात अद्यापही घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सुमारे चौदा लाख ग्राहकांपैकी केवळ नऊ लाख ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरत आहेत. उरलेल्या ग्राहकांनाही रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी महावितरणने ही अनोखी बक्षीस योजना आणली आहे.
वीजबिल ऑनलाइन भरण्यासाठी महावितरणने संकेतस्थळ, मोबाइल ॲप उपलब्ध करून दिलेले आहे. ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते. ऑफलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांनी पहिल्यांदाच ऑनलाइन बिल भरल्यावर त्यांना स्क्रीनवर गो-ग्रीनची पॉप-अप दिसणार आहे. गो-ग्रीन योजनेत ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एकरकमी १२० रुपये सूट दिली जाईल. गो-ग्रीनमध्ये पुढील प्रत्येक ग्राहकाला ई-मेल व मोबाइलवर माहिती मिळेल. त्यामुळे ग्राहकाला एक टक्का ‘प्रॉम्प्ट पेमेंट’ सवलतही मिळवता येते.