राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षण समागम २०२५
आ. डॉ. आशिष देशमुख यांच्याकडून प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व कौतुक!
कळमेश्वर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने आयोजित “अखिल भारतीय शिक्षण समागम” या भव्य कार्यक्रमात PM SHRI नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळमेश्वर या शाळेने दिनांक २९ जुलै २०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त केला.
देशभरातील उत्कृष्ट ६४४ PM SHRI शाळांमध्ये कळमेश्वर येथील शाळेची निवड होणे, हा केवळ शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण कळमेश्वर शहरासाठी, तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.या निवडीसाठी देशभरातील शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. शिक्षण पायाभूत सुविधा, डिजिटल साधनसंपत्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोपक्रम या निकषांवर आधारित हे सन्मान प्रमाणपत्र मिळाले आहे.
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेन्द्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यशस्वी अंमलबजावणी आणि त्याचे दूरगामी परिणाम यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना थेट प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शाळेमध्ये स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर आणि इंटरनेट सुविधेद्वारे करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषद कळमेश्वरचे मुख्याधिकारी मा. आकाश सुरटकर, गट शिक्षणाधिकारी श्री कैलास लोखंडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष बिरजू रघुवंशी, वयोवृद्ध पालक श्री धोटे, शाळेच्या प्राचार्य श्रीमती पौर्णिमा मेश्राम, तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शाळेला दर्जा मिळवून देण्यात प्राचार्य पौर्णिमा मेश्राम व त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या दूरदृष्टी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि नेतृत्वगुणांमुळे शाळेने हे यश प्राप्त केले असून, ते इतर शाळांसाठी आणि संपूर्ण कळमेश्वर शहरासाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.