कळमेश्वर परिसरात अवैध धंद्यांचे जाळे फोफावले!

दारूविक्री, हुक्का पार्लरचा सुळसुळाट; तरुणाईच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर–काटोल मार्गावर कारवाईची गरज; गोडखैरी येथील हुक्का पार्लरवर पोलिसांची धडक, १० हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त

कळमेश्वर | प्रतिनिधी  : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर–काटोल मार्गावरील अनेक लहान-मोठ्या ढाब्यांमध्ये आणि सावजी भोजनालयांमध्ये कथित अवैध दारूविक्री तसेच मद्यपानासाठी सुविधा उपलब्ध असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यातच हुक्का पार्लरची वाढती संख्या आणि तेथे तरुण-तरुणींची होणारी गर्दी हा चिंतेचा गंभीर विषय बनला आहे. या कथित अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे होणारे अपघात, त्यात मृत्युमुखी पडणारे नागरिक आणि गंभीर जखमी होऊन कायमचे अपंगत्व येणाऱ्या व्यक्तींचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. या घटनांना केवळ अपघात म्हणून न पाहता मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि प्रतिबंधात्मक कारवाईतील त्रुटी यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मात्र, अपघातांमध्ये गंभीर जखमींची संख्या झपाट्याने वाढणे अतिशय चिंतनिय आहे

गोडखैरी येथील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

दरम्यान, नागपूर–अमरावती महामार्गावरील हिंगणा टी-पॉइंटजवळील गोडखैरी परिसरातील अ‍ॅटमॉस्फिअर हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी कारवाई केली. उपलब्ध पोलिस कागदपत्रांनुसार, कारवाईदरम्यान हुक्का फ्लेवर्स, हुक्क्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि संबंधित उपकरणे असा एकूण १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

पोलिसांनी हॉटेल परिसराची पाहणी करून संबंधित व्यक्तींकडून माहिती घेतली. या कारवाईत हुक्का फ्लेवर्सची पाकिटे, हुक्क्यासाठी वापरले जाणारे पाइप आणि इतर साहित्याचा समावेश असल्याचे जप्तीच्या नोंदीतून दिसते. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि संबंधित साहित्याच्या वापरासंदर्भातील बाबींची अधिकृत माहिती मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कारवाईपुरतेच मर्यादित न राहता नियमित तपासणी हवी

एका ठिकाणी कारवाई झाली असली, तरी संपूर्ण परिसरातील अवैध दारूविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, नियमबाह्य हुक्का पार्लर आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. ढाबे, भोजनालये आणि हॉटेल्सची नियमित तपासणी, परवाने व नियमांचे पालन यांची पडताळणी तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांची तपासणी यावर भर देणे गरजेचे आहे.

तरुण पिढीचे आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ठोस पावले उचलावीत. कळमेश्वर परिसरातील कथित अवैध व्यवसायांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News