कळमेश्वर-फेटरी येथे ओयो हॉटेलमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
नागपूर ग्रामीणमध्ये दहशतीचे वातावरण
का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर-पियुष ढोने
कळमेश्वर : कळमेश्वर–नागपूर महामार्गावरील फेटरी परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरला आहे. ओयो लॉजमधील खोलीत तरुणीची चाकूने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि प्रचंड खळबळ उडाली आहे. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याच कळमेश्वर पोलीस हद्याीत मोहप्याजवळ वाठोडा शिवारात दोन खुनाचे गुन्हे घडले होते, त्याची धास्ती कमी होत नाही तोच आता पुन्हा एक खून झाल्याने नागरिक अक्षरशः हादरले आहेत. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणीचे नाव रुचिता राजेश भांगे (वय 21) असे असून ती नागपूर येथील धनवटे महाविद्यालयात बी.ए. फायनलचे शिक्षण घेत होती. ती पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सौरभ उर्फ बिट्टू जामगडे (वय 25, रा. आष्टी, ता. कळमेश्वर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रुचिता घरातून बाहेर पडली होती. मात्र ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, 23 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास फेटरी येथील ओयो लॉजमधील खोली क्रमांक 105 मध्ये तिचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. तिच्या शेजारी चाकू आढळून आला असून, प्रेमसंबंधातील वादातून आरोपीने चाकूने वार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे.
मृत तरुणीचे वडील राजेश मोजी भांगे, व्यवसायाने ड्रायव्हर, यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी आरोपी सौरभ याने यापूर्वीही मुलीला त्रास दिल्याचे, धमकावल्याचे आणि मारहाणीचे प्रकार केल्याचे नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीच्या सरावादरम्यान आरोपीने रुचिताला मारहाण करून तिचा मोबाईल घेऊन गेल्याची माहितीही समोर आली आहे.
या घटनेनंतर फेटरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, महामार्गालगत असलेल्या हॉटेल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रश्न कायम – नागरिकांना दिलासा मिळणार का?
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कळमेश्वर पोलीस हद्याीत दोन खुनाच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले होते. त्यानंतरही चोरी, घरफोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. महामार्गालगत असलेली हॉटेल्स, लॉजेस आणि सुनसान परिसर गुन्हेगारांचे अड्डे बनत चालल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे.
घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, घटनेनंतर पोलिसांनी तपासाला गती दिली असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पोलीस बंदोबस्त, नियमित गस्त आणि हॉटेल-लॉजेसवर कडक नियंत्रण आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. या निर्घृण हत्येने संपूर्ण नागपूर ग्रामीण भाग हादरून गेला असून, सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
![]()
![]()