कारंजा तालुका वकील संघातर्फे आमदार सुमीतदादा वानखेडे यांचा सत्कार
का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर – परमानंद मुदगल
कारंजा (घा.), : आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमीतदादा वानखेडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे कारंजा (घा.) तालुक्यातील तब्बल दहा गावांना पुन्हा कारंजा दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल कारंजा (घा.) तालुका वकील संघातर्फे आमदार सुमीतदादा वानखेडे यांचा शाल व ग्रामगीता देऊन नुकताच (दि. २२ डिसेंबर २०२५ ला) सत्कार करण्यात आला.
गेल्या सुमारे दहा वर्षांपासून कारंजा (घा.) तालुक्यातील सारवाडी, देववाडी, जसापूर, किन्हाळा, माळेगाव (काळी), पांजरा (बंगला), नरसिंगपूर, रानवाडी, पारडी व एकांबा ही गावे कारंजा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून वगळून आर्वी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जोडण्यात आली होती. त्यामुळे संबंधित गावांतील नागरिक, पक्षकार व वकील वर्गाला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन कारंजा (घा.) तालुका वकील संघाने आमदार सुमीतदादा वानखेडे यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत आमदार वानखेडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सदर सर्व गावे पुन्हा कारंजा (घा.) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत.
या प्रसंगी कारंजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी. जी. धारपूरे, उपाध्यक्ष ॲड. जे. डी. टोपले, सचिव ॲड. डी. एम. धांदे, सहसचिव ॲड. डी. जी. टहेटवार, कोषाध्यक्ष ॲड. के. पी. नासरे, ग्रंथपाल ॲड. डी. एस. दुपारे, सल्लागार ॲड. ए. पी. पराडकर, सदस्य ॲड. आर. व्ही. मस्के, ग्रामसेवक हेटीकुंडी येथील जगदीश हजारे, सामाजिक कार्यकर्ते पवन भक्ते आदी मान्यवर उपस्थित होते.