♦ अंतिम सुनावणीपर्यंत अटकेपासून अभय; चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा, पोलिसांना आदेश
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोठा दिलासा मिळाला आहे.
कुणाल कामराने एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एक विडंबन केले होते. त्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना ‘गद्दार’ म्हणून हिनवले होते. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला अनेकदा समन्स पाठवले. पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यानंतर त्याने आपल्यावरील एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने शुक्रवारी त्याची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश दिले.
चेन्नईला जाऊन कामराचा जबाब नोंदवा
न्यायमूर्ती सारंग कोतवाल व श्रीराम मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी ट्रायल कोर्टाला आरोपपत्राची दखल न घेण्याचे निर्देश दिलेत. एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनाही आपला तपास सुरू ठेवत गरज भासली तर चेन्नईला (कामरा राहत असलेल्या विल्लुपुरमच्या जवळ) जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेत. आदेशाची सविस्तर प्रत अजून उपलब्ध व्हायची आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे खंडपीठाने 16 एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावेळी खंडपीठाने कुणाल कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. यावेळी कोर्टाने पोलिसांनी त्याला बजावलेल्या कलम 35(3) BNSS अंतर्गत जारी केलेल्या समन्सचाही दाखला दिला होता. या समन्सनुसार, संबंधित व्यक्तीला अटक करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट होते, असे कोर्टाने म्हटले होते.
शिंदे यांना देशद्रोही म्हणण्यावरून वाद सुरू झाला
36 वर्षीय स्टँडअप कॉमेडियनने आपल्या शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर टीका केली होती. कामराने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन केले होते. त्यात शिंदे यांना गद्दार म्हटले होते. त्याने गाण्याद्वारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर विनोदी शैलीत भाष्यही केले होते. त्यानंतर शिंदे समर्थकांनी मुंबईतील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची तोडफोड केली. कुणालचा कार्यक्रम याच हॉटेलमध्ये झाला होता.
कामराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, 23 मार्चच्या रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. शिंदे म्हणाले, ‘याच व्यक्तीने (कामरा) सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, अर्णब गोस्वामी आणि काही उद्योगपतींवर भाष्य केले होते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. ते एखाद्यासाठी काम करण्याबद्दल आहे.”
दरम्यान, कुणाल कामरा यांनी शिंदेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नसल्याचे सांगितले आणि मुंबईतील ज्या ठिकाणी कॉमेडी शो रेकॉर्ड करण्यात आला त्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीची टीका केली.