वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत आघाडी करणार
2 तासांपूर्वी :>
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यात आम्हाला काहीच अडचण नाही, असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. केवळ मतचोरीच नव्हे, तर सर्वच मुद्यांवर आमची राहुल गांधींसोबत एकत्र येण्यास हरकत नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीत प्रवेश करणार काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आज अकोल्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी राज्यातील ओला दुष्काळ, मराठा ओबीसी आरक्षण वाद, सध्याचा राजकीय घटनाक्रम आदी विविध मुद्यांवर विस्तृत प्रकाश टाकला. विशेषतः वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत आघाडी करण्यास काहीही हरकत नसल्याचेही पुन्हा एकदा स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचे अधिकार आम्ही आमच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेत. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशीही आमची युती करण्याची तयारी आहे. आमची काँग्रेससोबतही आघाडी करण्याची तयारी आहे. केवळ मतचोरीच्याच नव्हे तर सर्वच मुद्यावर राहुल गांधींसोबत एकत्र येण्यास आमची हरकत नाही. मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी एकत्र येण्यास आम्हाला काहीच अडचण नाही.

ओला दुष्काळ जाहीर करण्यावरून खडेबोल
आंबेडकरांनी यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्यावरून महायुती सरकारवर सडकून टीका केली. तसेच विरोधकांनाही फैलावर घेतले. ते म्हणाले, मुख्यमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात विलंब का लावत आहेत? ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाययोजनांना परवानगी देऊ शकत नाही. पूरस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही हा नियम आहे. सध्या सर्वेक्षण व इतर कोणत्याच गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळे अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? हा प्रश्न आहे. विरोधकही सध्या शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. पण ते मुख्यमंत्री असताना (उद्धव ठाकरे) त्यांनी काय केले? हा आमचा प्रश्न आहे.
सरकारची 2200 कोटींची मदत फारच तुटपुंजी
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नाही, तर जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. सरकारने या प्रकरणी 2200 कोटींची मदत जाहीर केली आहे. पण ती सध्याच्या अभूतपूर्व संकटाच्या तुलनेत फारच तुटपुंजी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा सेस वसूल केला जातो. तो आणि राज्याच्या सकल उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा 12 टक्के वाटा अशा संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीला का येत नाही? असा सवालही वंचितने या प्रकरणी उपस्थित केला आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 11