गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याची मागणी, विजय वडेट्टीवारांचा प्रशासनाला इशारा
गडचिरोली : गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज वैनगंगा नदीच्या पात्रात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. सोमवारी पाणी सोडले नाही, तर मंगळवारी अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू, असा इशारा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिला.
गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना शेती करायला अडचण निर्माण झाली आहे. नदी काठावरील गावातील भूजल पातळी सुद्धा कमी झाल्याने अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या असल्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गोसीखुर्द धरणातील तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
प्रशासन निर्ढावलेले, त्यांना वसुलीची काळजी
नदीकाठच्या गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही ते पाणी सोडायला तयार नाहीत. खासदार, आमदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील फोन केलेत. परंतु, प्रशासन जागे झाले नाही. पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने पाणी पट्टी मागितली. ज्यावेळेस तीव्र पाणीटंचाई असते, त्यावेळी कुठलेही निकष नसतात. सगळे निकष बाजूला सारून, सगळे माफ करून पाणी सोडावे लागते. परंतू, अधिकारी आणि शासन एवढे निर्धावलेले आहे की, यांना वसुलीची काळजी पडली आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
जनतेला पिण्याच्या पाण्याची गरज आहे, मात्र, संवेदनशून्य सरकार आणि त्यांचे अधिकारी काहीच करत नाही. त्यामुळे आज काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. सोमवारी पाणी सोडले नाही, तर मंगळवारी अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू, असा इशारा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिला.