गुजरातमध्ये शेजाऱ्यांनी व्यक्तीला जिवंत जाळले; कच्छच्या गांधीधाममध्ये धक्कादायक घटना
किरकोळ वादातूनडिझेल ओतून पेटवले; दोन महिलांसह तीन आरोपी अटकेत
कच्छ (गुजरात) : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे शेजाऱ्यांमधील किरकोळ वादाचे भीषण रूपांतर होत एका व्यक्तीला डिझेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तीन आरोपींना अटक केली असून, एक महिला आरोपी फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी गांधीधामच्या रोटरी नगर परिसरात घराबाहेर बसण्याच्या मुद्द्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. वाद वाढताच आरोपींनी ५० वर्षीय करसनभाई यांना पकडून मारहाण केली.
मारहाणीनंतर करसनभाई आपल्या घरातील बाथरूममध्ये गेले असता, आरोपी त्यांच्यामागे तिथे पोहोचले. तेथेच आरोपींनी करसनभाई यांच्या अंगावर डिझेल ओतून आग लावली, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर गंभीररीत्या भाजले.
घटनेनंतर कुटुंबीयांनी करसनभाई यांना तातडीने भुज येथील जी.के. जनरल रुग्णालयात दाखल केले. रात्री पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचा मृत्यूपूर्व जबाब (डायिंग डिक्लरेशन) नोंदवण्यात आला. मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
![]()
तीन आरोपी अटकेत, एक महिला फरार
या घटनेनंतर गांधीधाम बी डिव्हिजन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक एस. व्ही. गोजिया यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
प्रेमिलाबेन नरेशभाई मातंग (वय ३०)
अंजूबेन उर्फ अजीबेन हरेशभाई मातंग (वय ३६)
चिमनाराम गोमाराम मारवाडी (वय ४७)
यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील मंजुबेन लाहिड़ीभाई माहेश्वरी ही महिला आरोपी सध्या फरार असून, तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.
![]()