चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
कळमेश्वर नगर परिषदेच्या बगीच्यातली घटना
नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : आज गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी (दिनांक 6) सायंकाळी 7.45 दरम्यान कु. सोनाली संजय मरसकोल्हे (वय 12 वर्षे) हिचा न. प. च्या बगिच्यात खेळत असतांना हायमास लाईट इलेक्ट्रिीक पोलच्या खूल्या वायरला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. मृत सोनाली स्थानिक इंदिरा गांधी माध्य. विद्यालयात इयत्ता सहावीला शिकत होती व घटनेच्या वेळी ती आपल्या लहान बहिणीसोबत नगरपरिषद बालोद्यान तळाची पार येथे खेळण्याकरिता आली होती.
कळमेश्वर पोलीसात मृत सोनालीचे वडिल संदीप प्रितम मरस्कोल्हे, वय 34 वर्ष रा. गजानन मंदीर जवळ, कर्णे लेआऊट, वार्ड नं. 15 कळमेश्वर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट प्रमाणे रोजमजुरीचे काम करतात. त्याची पत्नी दोन-तीन वर्षा पुर्वी दोन मुलींसह त्याला सोडून निघून गेली आहे. मृत सोनाली व दुसरी वैष्णवी 09 वर्ष यांचेसह तो वर नमूद पत्यावर राहतो.
नेहमीप्रमाणे आज दोन्ही मुली व इतर दोन -तीन मैत्रिणी तळ्याची पार येथील हनुमान मंदीरात दर्शन करुन सर्व तळयाची पार गार्डन मध्ये फिरायला जाउन व खेळत होती.अंदाजे सांयकाळी 07.30 वा. दरम्यान मृत सोनाली हीला लघुशंका आल्याने शनिदेव मंदीराला लागुन असलेला वाॅल कम्पाऊन्ड वर चढुन खाली उतरत असतांना तिने ईलेक्ट्रीक खांबाच्या ईलेक्ट्रीक पेटी वर पाय देऊन उतरत असतांना उघड्या पेटीतल्या खुल्या वायरचा शाॅक लागून गंभीर जखमी झाली. तेथीलच काही लोकांच्या लक्षात आल्यावरून सोनालीला कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेलेे असता डाॅ. नी मृत घोषित केले.
सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा : मंगेश गमे
कळमेश्वर पोलीसांनी गुन्हयाची नोंद घेतल्याची माहीती आहे. (मर्ग दाखल केला असल्याचे कळते). स्थानिक जागरूक सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रीया देतांना या घटनेस नगर परिषदेचा भोंगळ कारभार जबाबदार असून याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाईसह मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अश्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची दक्षता घेण्याची तंबीही दिली आहे.