December 1, 2025 6:25 am

जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीत घोळ तपासण्याचे आदेश

महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळ उघड

निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश, राजकीय वातावरण तापले

महाविकास आघाडी आणि मनसेच्या प्रयत्नांना यश

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीतील गंभीर त्रुटींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सलग दोन दिवस निवडणूक आयोगावर आरोपांची सरबत्ती केल्यानंतर अखेर मुख्य निवडणूक आयुक्त श्री. चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत. ही कारवाई निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
                        गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मतदार यादीतील विसंगती सतत समोर येत होत्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील यावर प्रकाश टाकत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदार यादीमध्ये मोठे घोळ असल्याचे ठळकपणे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करत, यात त्वरित कारवाईची मागणी केली.

एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंद

                         विरोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये एका घराच्या पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नोंद असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तसेच, जयश्री मेहता नावाच्या महिलेसाठी दहिसर, चारकोपसह एकूण चार ठिकाणी मतदार नोंद असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मोहन नंदा बिलवा नावाच्या दुसऱ्या महिलेसाठीही तीन वेगवेगळ्या ठिकाणी नावे असल्याचे उघड झाले. या प्रकरणांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देणे कठीण झाले, मात्र आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दोषींवर कठोर कारवाईची तयारी

                        मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, एकाच मतदाराचा डेटा वेगवेगळ्या ठिकाणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, हा अहवाल दिवाळीनंतर सादर होण्याची शक्यता आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर विरोधी पक्षांना त्याची प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज ठाकरे यांचा विशेष पाठपुरावा

                        मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यामध्ये आघाडी घेतली आहे. त्यांनी मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही अनेक नागरिकांची नावे यादीत चुकीची असल्याचे, फोटो नसणे, अपूर्ण माहिती, वडिलांचे वय मुलांच्या वयापेक्षा कमी दाखवले जाणे यांसारख्या त्रुटींचा त्यांनी पाढा वाचला.
                        राज ठाकरे यांनी आणखी एका मुद्द्यावर जोर दिला — निवडणूक प्रक्रियेदरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा अधिकार आयोगाकडे असताना, विरोधकांना तो का दिला जात नाही? या पारदर्शकतेच्या अभावावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाविकास आघाडीची एकजूट

                         शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांसारख्या महाविकास आघाडीतील नेत्यांनीही निवडणूक आयोगाशी थेट चर्चा करत यादीतील त्रुटी दूर करण्याची जोरदार मागणी केली. निवडणूक आयोगाने केवळ स्थानिक नव्हे तर केंद्रीय यंत्रणांच्या साहाय्याने व्यापक तपास करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी देखील केली आहे. महाराष्ट्रातील मतदार यादीतील या गंभीर त्रुटी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आयोगाच्या चौकशी आदेशामुळे पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीनंतर येणारा अहवाल आणि त्यानंतर होणारी कारवाई, ही या प्रकरणाची पुढील दिशा ठरवणारी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News