February 7, 2026 7:09 am

ठाण्यातील भिवंडीत खड्ड्यांमुळे डॉक्टरचा मृत्यू, आतापर्यंत तिघांचा बळी

दुचाकीसह खाली पडले अन् मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले,

https://twitter.com/i/status/1959105061692305442ठाणे : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटलजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. या अपघातात शहरातील डॉक्टर नसीम अन्सारी यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
                        मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर नसीम अन्सारी हे रात्री जेवणासाठी ढाब्यावर गेले होते. जेवण करून ते आपल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांचा तोल गेला आणि ते दुचाकीवरून खाली पडले. दुर्दैवाने त्याच क्षणी मागून येणाऱ्या एका ट्रकच्या मागील टायराखाली ते चिरडले गेले. या भीषण घटनेत डॉक्टर अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला.
                        घटनेची माहिती समजताच मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक घटनास्थळी जमले. रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेमुळे संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून धरला आणि तीव्र आंदोलन छेडले. काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. संतापलेल्या नागरिकांचा संतप्त सवाल होता की, “रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव गेले, त्याला जबाबदार कोण?”
                       दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमावाला समजावून सांगितले व परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातामुळे शहरात शोककळा पसरली असून रस्त्यांची दयनीय अवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात या मुद्द्यावर पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News