February 7, 2026 6:03 pm

डॉक्टरचे अल्पवयीन रुग्णासोबत अनैतिक कृत्य : गुन्हा दाखल

डॉक्टरचे अल्पवयीन रुग्णासोबत अनैतिक कृत्य

भंडाऱ्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये विकृत प्रकार, आरोपी पसार 

का टा वृत्तसेवा I संजय मते
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १७ वर्षीय मुलीसोबत सोनोग्राफीच्या बहाण्याने डॉक्टरनेच अनैतिक वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
                        यातील पीडिता मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास एकांतात अनैतिक कृत्य केले, असा गंभीर आरोप आहे. घडलेली घटना पीडितेने आई-वडिलांना सांगितल्यावर साकोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, आरोपी डॉक्टर फरार आहे.
                        फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची मुलगी फेब्रुवारी २०२५ मध्ये पॅनिक अटॅकमुळे आजारी होती. उपचारासाठी तिला श्याम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर काही वैद्यकीय त्रास पुन्हा उद्भवल्याने ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता तिला उपचारासाठी डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्याकडे घेऊन आली. तेव्हा डॉक्टरांनी सोनोग्राफी आवश्यक असल्याचे सांगून आई व नर्सला बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर सोनोग्राफीच्या नावावर डॉक्टरने पीडित मुलीच्या कपड्यांवरून हात फिरवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
                          याबाबत पीडितेने रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर आईला रडत रडत घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. नंतर पीडित मुलगी व आई घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना मुलीसोबत घडलेली घटना सांगितली. आरोपी डॉक्टरने मुलीचा हात धरून मोबाईल क्रमांक मागितला व बाहेर कोणालाही काही सांगू नको, असे बजावल्याचे पीडितेने सांगितले. यापूर्वीही आरोपी डॉक्टरने इन्स्टाग्रामवरून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे तिच्या जबाबात नमूद आहे. पीडितेच्या वडिलांनी संपूर्ण प्रकार ऐकून पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
                           साकोली पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून डॉक्टर देवेश अग्रवाल (वय अंदाजे ४५ वर्ष) यांच्याविरुद्ध पोक्सो आणि अनुसूचित जाती जमती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टर फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात डॉक्टरविरोधात संतापाची लाट पसरली आहे.

0
0

Leave a Reply

Realted News