August 15, 2025 4:36 am

तुमसरचे एसडीओ आणि तहसीलदार निलंबित, रेती उत्खनन, तस्करी आणि साठेबाजीत सहभाग

महसूलमंत्र्यांनी काढले एसडीओ आणि तहसीलदारच्या निलंबनाचे आदेश

का टा वृत्तसेवा
भंडारा : जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरल्याचा व साठेबाजीत सहभागी असल्याचा ठपका ठेवत तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी हे आदेश काढले. रेती तस्करांनी बावनथडी व वैनगंगा नदीचे पात्र नियमबाह्य पोखरले आहे.
                          येथील रेती चोरी प्रकरण विधिमंडळ अधिवेशनातही गाजले होते. रेती चोरी प्रकरणाला महसूल विभागातील अधिकारी कसे जबाबदार आहेत, याची माहिती आमदार नाना पटोले व आमदार जयंत पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहापुढे ठेवली होती. अवैध रेती उत्खनन रोखण्याची व संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली होती. तसेच अवैध रेतीच्या डंपरच्या अपघातात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळण्याचीही मागणी केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
                          रेती तस्करी अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. तस्करीत गुंतलेले दलाल, कार्यकर्ते व अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. व्हायरल पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली होती .. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गंभीरपणे लक्ष द्यावे. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
                           रेती तस्करी अवैध वाळू उत्खनन आणि साठेबाजीत सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना पत्र लिहून येथील अवैध रेती उत्खननावरून अनेक गंभीर आरोप केले होते. सत्तापक्षातील या आमदारांचे ते पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर बरीच खळबळ माजली होती. त्याची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. राजू कारेमोरे यांच्या त्या पत्रानंतर विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनीही मुख्यमंत्र्यांना येथील अवैध रेती उत्खननाबद्दल पत्र दिले होते. तस्करीत गुंतलेले दलाल, कार्यकर्ते व अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. दर्शन निकाळजे हे तुमसर उपविभागीय अधिकारी पदावर ३० ऑगस्ट २०२३ पासून रुजू झाले होते. गडचिरोली येथे परिविक्षाधिन कालावधी पाडल्यानंतरची त्यांची ही येथील पहिलीच पोस्टिंग होती. तर, तहसीलदार मोहन टिकले हे २ फेब्रुवारी २०२४ ला येथे रुजू झाले होते.

 

                          विभागीय आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालात भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागात पर्यावरण विभागाची अनुमती नसताना रेती घाटांमधून उत्खनन झाल्याचे नमूद आहे. हा प्रकार थांबविण्याची जबाबदारी असतानाही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार प्रतिबंध घालू शकले नाही. त्यामुळे यात ते लिप्त असल्याचा ठपकाही अहवालात ठेवण्यात आहे.
                          प्रसारमाध्यमांनी सातत्याने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील रेतीघाटावरून रेतीचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठेेबाजी मोठ्याप्रमाणावर होत असल्याच्या बातम्या दिल्या असून, यात महसूल विभागाचाही 100 टक्के सहभाग असल्याचे दिसून येते. या रेती तस्करात प्रामुख्याने बड्या राजकिय नेत्यांचे नातेवाइक व खास कार्यकर्तेच शामिल असून त्यांचेवर त्याचे नेत्यांचा व मोठया अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे दिसून येते. तर या तस्करांसोबत पंगे घेण्यापेक्षा आपला ठरलेला हप्ता घेवून मोकळे होणारे लहानमोठे जवळपास सर्वच दर्जाचे महसुली महाभाग गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दृश्य सर्वत्र आहे.
                           सर्वच वृत्तपत्र व अन्य प्रसारमाध्यमांमधून रेतीचे अवैध उत्खनन, वाहतूक  मुरमाच्या बाबतीतही आहे, या मुरूम तस्करांनी तर अक्षरशः  मोठ्या मोठ्या टेकड्याच रातोरात जमीनदोस्त करून टाकल्या आहेत. या बातम्या रोजच्याच असल्या तरी त्यावर होणारी फौजदारी कारवाईच्या बातम्या पुढे कारवाई सहित लुप्त झाल्याने रेती तस्करीवर अंकुश लावणे शासनाला शक्य आहे काय? हा संभ्रम नागरिकांमध्ये कायम आहे. मध्य प्रदेशातून होणाऱ्या तस्करीचा प्रकारही अनेक बातम्यांमधून उघडकीस आणला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News