धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला वेग
५६ सीसीटीव्ही कॅमेरे, एक हजार शौचालये आणि ११० बसेसची व्यवस्था
नागपूर : ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून लाखो भाविक दीक्षाभूमीला भेट देणार असल्यामूळे जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा येत्या ३० सप्टेंबर पूर्वी पूर्ण करतानाच नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात प्रशासनाच्या विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी घेतला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य सुधीर फुलझेले, डॉ. प्रदीप आगलावे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा तसेच पोलीस, महसूल, परिवहन, आरोग्य, अन्न व प्रशासन आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण देशातून मागील वर्षीप्रमाणे १० ते १२ लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील. यादृष्टीने व्यवस्था करतांना विविध यंत्रणांनी समन्वयाने संपूर्ण जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना श्रीमती बिदरी यांनी यावेळी केली. येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाणी, शौचालय व स्वच्छतेसंदर्भात महानगपालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात यासाठी १२० तात्पुरते नळ उभारण्यात आले असून भोजनदान करणाऱ्या संस्थांसाठी अतिरिक्त ७ टँकर सज्ज ठेवण्यात आले आहे. दीक्षाभूमी परिसरात माता कचेरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी परिसरात ९९२ शौचालय उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच मोबाईल शौचालयाची सुविधा राहणार आहे. पावसाच्या दृष्टीने परिसरातील शाळांमध्ये राहण्यासाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

दीक्षाभूमी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून मोबाईल टॉवर सुद्धा उभारण्यात आला आहे. संभाव्य गर्दीच्या नियंत्रणासाठी व सुरक्षेच्यादृष्टीने स्टॉलवर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सिलेंडर, इतर ज्वलनशील साहित्य ठेवता येणार नाही, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली. दीक्षाभूमी येथील स्तूपाकडे प्रवेश तसेच दर्शनानंतर बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्थेसंदर्भातील संपूर्ण माहिती सोशल मीडिया व डॅशबोर्डवर उपलब्ध राहणार आहे. रेल्वे स्टेशन व बसस्टॅण्ड तसेच ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी परिवहन विभागातर्फे ११० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर शहरातील भाविकांसाठी ११ मार्गांवर ३० सप्टेंबर पासून आपली बस सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी या व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आरोग्य विभागातर्फे रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच परिसरातील महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. पोलिस विभागातर्फे दीक्षाभूमी परिसरात एक हजारपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सुरक्षेच्यादृष्टीने नियुक्त करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ तसेच हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातील माहिती देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष व महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाद्वारे सुविधा राहणार आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहतील, यादृष्टीने व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात ३५० पेक्षा जास्त पुस्तक विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 11