December 1, 2025 7:30 am

नवरात्रोत्सव गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको : विश्व हिंदू परिषद

विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेने नव्या वादाला तोंड

हे भूषणावह नाही म्हणत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसचा विरोध

नागपूर : नवरात्रोत्सवातल्या गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतल्याचे समजते. नागपूरमधील गरबा आयोजकांना त्यांनी तशा सूचना दिल्यात. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवापूर्वी खडाखडी सुरू झालीय. देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना धर्माच्या नावावर राजकारण करून पोळी शेकायची आहे, असा आरोप केलाय.
                         देशभरात सोमवारी, 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल. त्या पार्श्वभूमीवर गरबा आयोजकांनीही जोरदार तयारी सुरू केलीय. राज्यभरात ठिकठिकाणी छोट्या शहरांपासून ते थेट मेट्रो सिटीपर्यंत गरब्यासाठी स्टेज, मंडप उभारणी सुरूय. मात्र, तत्पूर्वीच आरोप-प्रत्यारोपाची राळ उठलीय.
                         नवरात्रोत्सव फक्त हिंदूचा आहे. त्यामुळे गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको. गरब्यामध्ये प्रवेश देण्यापूर्वी आधारकार्ड तपासा. त्यानंतर प्रवेश द्या. मुस्लिम तरुणांनी गरब्यामध्ये प्रवेश केला, तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, अशा सूचना विश्व हिंदू परिषदेने नागपूरमध्ये गरबा आयोजकांना दिल्याचे समजते. त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आक्रमक झालीय. त्यांनी या भूमिकेला विरोध केलाय.

                          प्रत्येक गरब्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची करडी नजर असणार आहे. विश्व हिंदू परिषद या संदर्भात पोलिसांशी भेट घेऊन त्यांनाही पत्र देणार असल्याचे समजते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील शाखा आहेत. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून या वर्षी यावर अजून तरी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांची भूमिका काय असते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही यापूर्वी अनेकदा विश्व हिंदू परिषदेने अशी भूमिका घेतलीय.

विष पेरण्याचे काम, महाराष्ट्राला भूषणावह नाही

                         उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यावर आक्रमक झालेत. ते म्हणाले की, या देशामध्ये अशाप्रकारे धार्मिक, धर्मांध वातावरण निर्माण करण्याचे काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजी रोटी आहे. मी अगदीच सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही.
                         संजय राऊत म्हणाले की, ‘ज्या प्रकारे विष पेरण्याचे काम चालले आहे, ते महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही, असे उत्तर राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिले. ठाकरे गटाने या विषयावर दोन वर्षांपूर्वीही अशीच भूमिका घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती राऊत यांनी आज केली.’

आपली पोळी शेकाचीय, देश अस्थिर करणे सुरू

                         काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘मुस्लिमांना गरब्यात प्रवेश नका देऊ. त्यांना आगच लावायची आहे. त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे. धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे आणि आपली पोळी शेकायची आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद काही नव्याने बोलतेय असे नाही.’
                             विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ‘देश अस्थिर करण्यासाठीच यांचा जन्म झालेला आहे. देशातले वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाट्टेल त्या स्तरावर जायचे अशी भूमिका घेऊन भाजपच्या सर्व संघटना काम करतात. त्यांना हा देश जोडून राहावा, देशातील मतभेद मिटावे, देश संविधानावर चालावा अशी मानसिकताच त्या लोकांची नाही.’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News