विशिष्ट समाजावर बुलडोझर कारवाई करू नका, हुसेन दलवाई यांची मागणी
दलवाई यांनी मंगळवारी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी स्थानिक रहिवाशी, एनजीओ प्रतिनिधी आणि पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या मते, उत्तर प्रदेशातील द्वेषपूर्ण राजकारण महाराष्ट्रात आणू नये.
दलवाई यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिरवी चादर जाळण्याच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली, त्यावेळी पोलीस काय करत होते? असा सवाल त्यांनी केला. सकाळच्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई न करता रात्रीच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईतील अनधिकृत इमारती आणि बिल्डरांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी, मात्र ती कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसावी, अशी त्यांची मागणी आहे.
दलवाई यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक एकोप्याचा उल्लेख केला. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम नेहमीच एकत्र राहिले आहेत. गुढीपाडवा, रामनवमी किंवा ईद सारखे सण शांततेत साजरे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जातीयवादाला स्थान नसून एकोप्याची परंपरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.