♦ सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
का टा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर
नागपूर :‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडीयमवर आज शनिवारी पार पडला. यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, शहरातील विविध योगाभ्यासी मंडळाचे कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागपूर शहर नशा मुक्त करण्याकरिता नागपूर पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन थंडर’ अंतर्गत उपस्थितांना नशा मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीमती अनामिका मिर्जापुरे यांनी प्रतिज्ञा दिली. जागतिक योग दिनाच्या आठवणींनींना उजाळा देत रामभाऊ खांडवे यांनी दैनंदिन जीवनातील नियमित योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. नागपुरात जनार्दन स्वामी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा योग दिन साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.

चित्तथरारक प्रात्यक्षिके : जागतिक योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात नागपूर जिल्हा योग असोसिएशनचे अनिल मोहगावकर व संदीप खरे यांच्या चमूने योगाचे विविध मानवीय मनोरे व कठीण योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे सादरीकरण करणाऱ्या संघात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता. नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते, अनेक आजारांना दूर ठेवता येते. याबाबत जनजागृती करणारे “करा हो नियमित योगासन’ हे गीत म्हणत आज रोजी सकाळी हजारो योगसाधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
योगमय वातावरण : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंतोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियममध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकावर पुष्पवर्षाव करण्यात आला. एका रांगेत शिस्तबद्ध रीतीने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय झाले होते.