♦ मंदिराखालील गोदामातून 42 लाखांचे अंमली पदार्थ जप्त,
♦ टेक्सास स्मोक शॉपवर कारवाई
काटा वृत्तसेवा
नागपूर : पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धडक कारवाईत नागपुरात ४२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यातील मुख्य आरोपी शाहु याने त्याच्या घरासमोरील मंदिराखालीच माल साठवणुकीचे गोदाम तयार केले होते. बेकायदेशीररीत्या आणलेला माल या गोदामात साठवण्यात येत होता.
एक महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तांना ‘वेप सप्लाय’द्वारे ई-सिगारेट व हुक्का यांचा साठा व वापराबाबत गोपनीय माहिती मिळाली. तपासणी करून खात्री केली असता टेक्सास स्मोक शॉप नावाने चालणाऱ्या मॉडिफाइड स्मोक शॉप्समधून सिगारेट, हुक्का, गांजा पेपर, चारकोल, टोबॅको फ्लेवर, निकोटीन लिक्विड्स, गन टाईप लायटर अशा एकापेक्षा एक धोकादायक, प्रतिबंधित वस्तू खुलेआम विकल्या जात असल्याचे समोर आले. काही समाजकंटक तर घरपोच सेवा देत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिस आयुक्त यांनी मिशन एक्स अंतर्गत कारवाई केली.
मिशन एक्स अंतर्गत १७ ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात आली. २५ पोलिस अधिकारी आणि १२५ अंमलदाराची १६ पथके तयार झाली. प्रत्येक पथकात गुन्हे शाखेचे एक अधिकारी, तीन अंमलदार आणि पोलिस आयुक्तांनी स्वतः नियुक्त केलेला एक विशेष अंमलदार अशा टीम तयार करण्यात आल्या. कोणत्याही पथकाला एकमेकांबद्दलची माहिती देण्यात आली नाही. प्रत्येक पथकाला फक्त एका पोलिस स्टेशनच्या नावाचा लिफाफा दिला गेला. ही पथके पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी सर्व १६ ठिकाणी धाड टाकण्यासाठी रवाना झाली.
या रेड कारवाईत टेक्सास स्मोक शॉपच्या १३ ठिकाणी, एका गोडाउनमध्ये, तसेच दोन पान मटेरियल दुकाने अशा एकूण १७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये एकूण ३२ ठिकाणी झडती घेण्यात आल्या. तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ई-सिगारेट तसेच हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकुण ४३ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुख्य सूत्रधार आशिष उर्फ अंकुश अमृतलाल शाहू याने नागपूर शहरात “टेक्सास स्मोक शॉप’ या नावाने गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी फ्रँचायझी सुरू केली होती. सध्या शहरात अशा १४ ठिकाणी टेक्सास स्मोक शॉप कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. शाहू याच्या राहत्या घरासमोर मंदिराखाली तळघरात तयार केलेल्या गोडाउनमध्ये मोठ्या प्रमाणावर हुक्का साहित्याचा साठा आढळून आला.