♦ त्यांना पगारच माझ्यावर घाण आरोप करायचा मिळतो, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मुंबई : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना लक्ष केले जात आहे. त्यातच आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केल्याचा पुनरुच्चार केला. यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. पक्ष सोडल्यापासून राणे आमच्यावर टीका करतात. त्याचाच त्यांना पगार मिळतो, असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे.
या दरम्यान, राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी नुकताच उद्धव यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी नारायण राणे यांना दोनवेळा फोन केल्याचा दावा केला होता. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या पुनरुच्चाराद्वारे एकप्रकारे त्यांच्या दाव्याची पुष्टी केली आहे.