August 15, 2025 9:17 am

पहलगाम अतिरेकी हल्ला : प्रथमच जम्मू-काश्मिरात ऐतिहासिक बंद

मुदस्सीर कुलू | पहलगाम :  पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यांत २7 पर्यटकांच्या निर्घृण हत्येच्या िवरोधात बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये ऐतिहासिक बंद पाळण्यात आला. ३५ वर्षंात पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद पाहायला मिळाला. यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. संवेदनशील भागात निमलष्करी दल तैनात केले आहे. पीडीपी नेते वहीद पारा आणि मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर लोकांना या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स काॅन्फरन्स, अपनी पार्टीसह अनेक पक्ष व संघटनांनी बंदचे समर्थन केले.

                          जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यानंतर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी दहशतवादाचा नायनाट करा, अशा आशयाचे फलकही कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.


पहलगाम हल्ला, पाकिस्तानविरोधात 5 मोठे निर्णय 

                                           पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेली सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
                          परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, कॅबिनेट सुरक्षा समितीने (CCS) 5 प्रमुख निर्णय घेतले आहेत-
  • पहिला: पाकिस्तानसोबतचा १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित करण्यात आला आहे.
  • दुसरा: अटारी एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध परवानगी घेऊन या मार्गाने सीमा ओलांडली आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.
  • तिसरा: पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा अवैध मानले जातील. सध्या SVES व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागेल.
  • चौथा: नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
  • पाचवा: भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून त्यांचे संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागार मागे घेत आहे. संबंधित उच्चायोगांमध्ये ही पदे रद्द मानली जातील.
  • सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, पहलगामच्या बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी श्रीनगर ते दिल्ली अशा अनेक बैठका झाल्या.

दौरा… पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मूंचा दौरा रद्द

                        अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारचे कार्यक्रम रद्द केले आहेत. ते कानपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्‌घाटन करणार होते. यासोबत माेदी कानपूरमध्ये २० हजार कोटींच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसाम दौरा स्थगित केला आहे. त्या दोनदिवसीय दौऱ्यावर गुवाहाटी विद्यापीठाच्या ३२ व्या पदवीप्रदान सोहळ्यात सहभागी होण्यासोबत अनेक अन्य कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमणही अमेरिकेचा दौरा सोडून परतल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न

                         पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा देखील समावेश आहे. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत. यातील राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. यात मंत्री गिरीश महाजन हे जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत.

काश्मीरमधील ८०%, गुलमर्गमधील ७०% बुकिंग पर्यटकांनी केले रद्द

                         दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी होती. दऱ्याखोऱ्यांमध्ये आनंद होता. हॉटेल्स भरलेली होती आणि पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्गसारख्या ठिकाणी ८०% पर्यंत बुकिंग होती. या हल्ल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. आता काश्मीरमध्ये ८०% बुकिंग, गुलमर्ग-सोनमर्गमध्ये ७०% बुकिंग रद्द करण्यात आली आहे. दोन हॉटेल चालवणारे उमर अहमद म्हणाले की, माझ्याकडे ४० खोल्या आहेत, जूनपर्यंत १००% बुकिंग होते. आता सर्वांनी ते रद्द केले. पहलगाममध्ये १३० हॉटेल्समध्ये ३ हजार खोल्या आहेत. पण बुधवारी तिथे फक्त सुरक्षा कर्मचारी आणि हॉटेल मालक दिसले. बुधवारी श्रीनगर विमानतळावर ३०० पर्यटक आले, तर सामान्य दिवशी येथे रोज ४,००० पर्यटक येतात. दल सरोवराजवळ फक्त काही पर्यटक दिसले. संध्याकाळी सहसा गजबजलेला लाल चौक मात्र निर्जन पडून होता.


मशिदी अन् गुरुद्वारांचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले, लंगर सुरू

                         पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी सामान्य काश्मिरी लोक समोर येत आहेत. ते रस्त्यांवर भोजन, पाण्यासोबत आपल्या घरी आश्रय देत आहेत. श्रीनगरमध्ये गुरुद्वारा समितीने लंगर सेवा सुरू केली आहे. त्यांनी आवाहन केले की, तुम्ही काश्मीरच्या कोणत्याही भागात अडकला असाल तर जवळच्या गुरुद्वाराशी संपर्क साधावा. पहलगाम, अनंतनाग, श्रीनगर, गुलमर्ग, बारामुल्लातील सर्व भागांत खोल्या आणि लंगरच्या सुविधांचे गुरुद्वारे आहेत.

कापड व्यावसायिक नजाकतने छत्तीसगडच्या ११ लोकांना वाचवले

                         पहलगाम हल्ल्यात छत्तीसगडच्या चिरमिरच्या ४ कुटुंबातील ११ लोक अडकले. त्यात ३ मुलेही होते. २१ एप्रिल रोजी पहलगाम पाेहोचले होते. यात शिवांश जैन, हॅपी वधावन, अरविंद अग्रवाल आणि कुलदीपचा समावेश आहे. हल्ल्यावेळी सर्व लोक पहलगाममध्ये होते. शिवांश जैन म्हणाले, भूस्खलनामुळे रस्ते जाम झाले हाेते. तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला. लोक सैरावैरा पळू लागले. यादरम्यान स्थानिक काश्मिरी व्यापारी नजाकत अलींच्या मदतीने सर्व घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर पडले. नजाकत अली हिवाळ्यात चिरमिरमध्ये उबदार कपडे विकतात. पहलगाम पोहोचल्यावर त्यांच्याशी संपर्क केला होता. सर्व त्यांच्यासोबत फिरायला गेले होते. त्यांनी आम्हाला वाचवले.

टॅक्सी ड्रायव्हरने हल्ल्यानंतर आश्रय देऊन प्राण वाचवले

                         महाराष्ट्रातून पहलगाम फिरायला आलेल्या एका कुटुंबाने व्हिडिओ जारी करून सांगितले की, अतिरेकी हल्ल्यानंतर काश्मिरी टॅक्सी ड्रायव्हर आदिलने (काळ्या जॅकेटमधील) त्यांना हल्ल्यानंतर आश्रय दिला. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचले. आदिलने जेवू घातले. या व्हिडिओत आदिल म्हणतो, पहलगाम हल्ला माणुसकीची हत्या आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर बदनाम झाले. आमचा व्यवसाय गेला. पूर्ण मानुसकी शरमेने बुडाली आहे. चूक अतिरेक्यांनी केली, शिक्षा पूर्ण काश्मीर भोगेल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सलमान, शाहरुख, आमिरनेही दुःख व्यक्त केले

                        जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये तीव्र संताप आहे. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान सारख्या मोठ्या स्टार्सनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की निष्पाप लोकांना मारणे म्हणजे संपूर्ण मानवतेला मारण्यासारखे आहे.
                        सलमान खानने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘काश्मीर, पृथ्वीवरील स्वर्ग आता नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. एका निरपराध व्यक्तीलाही मारणे म्हणजे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखे आहे.
                         शाहरुख खानने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्याने लिहिले, ‘पहलगाममधील हिंसाचाराच्या कपटी आणि अमानवी कृत्याबद्दलचे दुःख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा वेळी, आपण पीडित कुटुंबांसाठी देवाकडे प्रार्थना करू शकतो आणि आपल्या मनापासून संवेदना व्यक्त करू शकतो. चला, एक राष्ट्र म्हणून आपण खंबीरपणे उभे राहू आणि या घृणास्पद कृत्याला न्याय मिळवून देऊ.’
                         या प्रकरणाची प्रतिक्रिया आमिर खानच्या टीमकडून आली आहे. त्याने लिहिले की, पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे, ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे आणि प्रचंड वेदना आणि यातना झाल्या आहेत. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या मनापासून संवेदना आहेत.
                           त्याच वेळी, बॉलिवूडमधील इतर अनेक स्टार्सनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय दत्त, अजय देवगण, जावेद अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्याचे वर्णन अत्यंत वेदनादायक केले आहे आणि मोदी सरकारकडून न्यायाची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News