पीएमश्री न. प. विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
कळमेश्वर: पीएमश्री नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नवीन शैक्षणिक वर्षानिमित्ताने आज ता.२३ जूनला विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्ताने नवागत विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे पुस्तके, वही, गणवेश, शूज-साॅक्सचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळा शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष बबन वानखेडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर शाळेच्या प्राचार्या श्रीमती पौर्णिमा मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता बिरजु रघुवंशी, पालक संघाच्या सहसचिव शिवानी इंगोले, सदस्य लक्ष्मी कटाई तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य पुनम आंबटकर, उपप्राचार्य दादाराव जांभरुणकर, पर्यवेक्षक बाबुराव राठोड उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व विषद करत शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाळेचे माजी विद्यार्थी बिरजू रघुवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चित्रकला वहयांचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्व. सतीश सौदागर यांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सुरेखा धरपाळ तर आभार प्रदर्शन प्रीती बाळसकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनीषा नेरलवार, प्रीती गोडसे, श्रीमती सुमन सिंग, विशाल साठवणे, चावर्क खैरे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.