♦ वाळूसाठ्यांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष, शहरात वाळूंचे ढिगारे
पुसद : पुसदमध्ये वाळू माफियांनी रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. महसुल व पोलिस यंत्रणा झोपा घेत आहेत. यासंदर्भात अनेक पुरावे उपलब्ध असूनही कारवाई होत नाही, अशी माहिती समोर येत आहे. महसुल व पोलिस प्रशासन वाळू माफीयांच्या दावणीला बांधले गेले अशी चर्चा मात्र शहरात सुरू झाली आहे. वाळू माफियाभोवती मोठे अर्थचक्र फिरते. साध्या बांधकाम मजुरापासून तर कर्ज घेऊन घर बांधणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. यात विशेष बाब म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सध्या वाळू घाटांचा लिलाव झालेला नसतानाही दामदुप्पट दराने राजरोसपणे वाळू टाकली जात आहे. हा संपूर्ण खेळ रात्रीच्या अंधारात चालतो हे विशेष. यात प्रशासनाचा महसूल बुडत असून सामान्यांचीही आर्थिक लूट होत आहे. असे असले तरी महसूल व पोलिस यंत्रणा मजेत असून रेतीमाफियांना खुले अभय दिले आहे. पुसद शहरात सर्वत्र बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम कुठल्याही कारणाने बंद पडल्यास रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीत वाळू माफियांची मोठी चांदी आहे. कायदेशीर वाळू उपशावर बंदी असली तरी महसुलातील व पोलिस यंत्रणेतील महाभाग या वाळू तस्करीला उघड पाठबळ देत आहेत. यातून त्यांनाही महिन्याकाठी मोठा फायदा होत आहे.
नुकसान मात्र सर्वसामान्यांचे होत आहे. वाळूतून येणारा महसूल बुडल्याने सरकारची गंगाजळी कमी होत आहे. तर बंदीच्या नावाखाली सामान्यांकडून वाळू करिता अवाजवी दर आकारले जात आहे. वाळू माफीया नऊ ते दहा हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळू खरेदी करावी लागत आहे. मागेल तितकी वाळू देण्यास माफिया तयार आहे. फक्त पैसे मोजण्याची ताकद हवी.
गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठा करण्यात येत आहे. मात्र, वाळू माफियांच्या अवैध वाहतूक वाळू साठ्यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे पुसद परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठवणूक सुरू आहे.