August 15, 2025 7:59 am

फरार गुन्हेगाराच्या घरातून तीन माऊझर, देशी कट्टे आणि गांजा जप्त

नागपुरात शस्त्रास्त्र साठ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक

नागपूर : सावनेर पोलिसांनी एका वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त केला आहे. २७ एप्रिल रविवारी मध्यरात्री टाकलेल्या या छाप्यात तीन माऊझर, दोन देशी कट्टे, ३६ जिवंत काडतुसे आणि दोन रिकामी काडतुसे हस्तगत करण्यात आली.
                         पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चनकापूरचा आशिष उर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा (२५), वलनीचा अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग (२९) आणि गब्बर दत्तूजी जुमळे (३०) यांचा समावेश आहे. वलनी वेकोली वसाहतीतील अभिषेक उर्फ छोटू याच्या घरात आरोपी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुख्य आरोपी आशिष उर्फ गुल्लू याने एका वर्षापूर्वी सावनेर येथील एका हॉटेलमध्ये हत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो फरार होता.
                           छाप्यादरम्यान पोलिसांनी शस्त्रास्त्रांसह एक किलो गांजा, नऊ मोबाईल, दोन अतिरिक्त सिमकार्ड आणि वजन मोजमापाचे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ७१ हजार ८०० रुपये आहे. खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News