सुपरवायझर ठार, 16 कामगार जखमी
सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी मालकाविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : बच्चू कडू
कामगार टाइम्स : मिलींद राऊत
नागपूर/ बाजारगाव : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या युनिटमध्ये बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एक कामगार ठार झाला असून, सोळा जण जखमी झाले आहेत. हा स्फोट कंपनीच्या पी.पी. १५ प्लांटमध्ये रात्री १२.३४ वाजताच्या सुमारास घडला. या दुर्घटनेने २०१८ मधील अशाच एका मोठ्या स्फोटाची आठवण करून दिली आहे.
मयूर गणवीर (वय २५) असे स्फोटात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होता. जखमी झालेल्यांमध्ये कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे आणि धर्मपाल मनोहर यांचा समावेश आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात मोठी दहशत पसरली. या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला किंवा किती जखमी झाले याबाबत कंपनी प्रशासन कोणतीही ठोस माहिती देण्यास तयार नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी कंपनी प्रशासन व पोलिस अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी जमले होते. ग्रामस्थांच्या भावनांना पाठिंबा देत बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनी मालकाविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे, तो आम्ही अजिबात सहन करणार नाही.” या कठोर भूमिकेमुळे ठिकाणी मोठा गदारोळ झाला व प्रशासनाला ग्रामस्थांच्या तीव्र भावना समोर झुकावे लागले.
संरक्षण क्षेत्राला स्फोटके आणि शस्रात्रे पुरवते कंपनी
संरक्षण क्षेत्रासाठी स्फोटके आणि शस्त्रे तयार करणाऱ्या आणि सुमारे ३० देशांना निर्यात करणाऱ्या सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या कंपनीत वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे सुरक्षिततेच्या उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताची काळजी घेण्यात होणारी हलगर्जीपणा यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.