बीड स्फोटाप्रकरणी NIA आणि ATS चौकशीची अबू आझमीची मागणी

राज्य सरकारचा बुलडोझर पंक्चर झाला का? :अबू आझमी यांचा संतप्त सवाल

मुंबई : मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने एखादा गुन्हा करण्याचा विचार जरी केला तरी त्यावर कडक कारवाई केली जाते. मात्र, बीडमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. अशावेळी राज्य सरकारचा बुलडोझर पंक्चर झाला का? असा संतप्त सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विचारला आहे. या प्रकरणात कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाचा एनआयए आणि एटीएस यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. बीडमध्ये झालेल्या मशिदी बॉम्बस्फोटानंतर आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटत आहेत.
                       बीडमधील मशिदीत झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले की, “जेव्हा मंत्री आणि मुख्यमंत्रीही दररोज मुस्लिमांविरुद्ध बोलतील, तेव्हा सामान्य माणसात मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण होईल आणि हे त्याचेच परिणाम आहे. बीडमध्ये एका व्यक्तीने म्हटले – तिथे मशीद कशी बांधली गेली? जर ती हटवली नाही तर मी ती उद्ध्वस्त करेन, आणि नंतर त्या व्यक्तीने मशिदीवर बॉम्ब फेकला आणि त्याच्यावर अतिशय सौम्य कलमे लावण्यात आली. मी अशी मागणी करतो की, दहशतवादी प्रकरणांमध्ये लावण्यात येणारे सर्वात कठोर कलम त्याच्यावर लावण्यात यावेत. एनआयए आणि एटीएसने चौकशी करावी. जर कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तिने असे कृत्य केले असते तर बुलडोझर कारवाई खूप लवकर केली गेली असती. परंतु मला वाटते की या प्रकरणात बुलडोझर पंक्चर झाला आहे. या देशात काय चालले आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दोन संशयितांनी गावातील मक्का मशिदीत रविवारी पहाटे जिलेटिनचा स्फोट घडवला

                           शनिवारी रात्री संदल मिरवणुकीत झालेल्या भांडणाच्या रागातून दोन संशयितांनी गावातील मक्का मशिदीत जिलेटिनचा स्फोट घडवला. रविवारी पहाटे 3 वाजता बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात ही घटना घडली. स्फोटापूर्वी विजयने जिलेटिनच्या कांड्यांसह व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता. सुदैवाने स्फोटाच्या वेळी मशिदीत कुणीच नव्हते, त्यामुळे कुणीही जखमी झाले नाही.
                          पोलिसांनी आरोपी विजय गव्हाणे व श्रीराम सागडे (रा.अर्धमसला) या दोघांना अटक केली. स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेले असून तीन दरवाजे, खिडक्या आणि पंखे तुटून खाली पडले. फरशी उखडली आहे. स्फोटानंतर 20 मिनिटात बीड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 6 वाजता दोघांना शिंपेगाव शिवारात मक्याच्या शेतातून पोलिसांनी अटक केली. दोघांवर तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News