April 12, 2025 10:12 am

बॅरि. वानखेडे महाविद्यालयात जलदिन साजरा

पाण्याचा वापर जबाबदारीने व काटकसरीने करणे, ही आपली सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी आहे : डॉ. संजय ठवळे 

कळमेश्वर : मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात १६ ते २२ मार्च जनजागृती सप्ताह आणि जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.
                     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मारोती कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. संजय ठवळे व डॉ. विनोद भालेराव होते. डॉ. संजय ठवळे यांनी पाणी दुधासारखे वापरले पाहिजे. कारण जल आहे तरच जीवन आहे, पाण्याशिवाय कोणताही प्राणी व सृष्टी जिवंत राहू शकत नाही. निसर्गाने जल हे मर्यादित दिले आहे. म्हणून पाण्याचा वापर जबाबदारीने व काटकसरीने करणे, ही आपली सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी आहे, असे विचार व्यक्त केले.                         डॉ. विनोद भालेराव यांनी जीवनात पाण्याचे महत्त्व काय आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. पाण्याअभावी साउथ आफ्रिकेतील केपटाऊन शहर कसे खाली झाले आहे, याचे उदाहरण देऊन पाण्याची बचत किती आवश्यक आहे. याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. व्ही. कोल्हे यांनी ग्रामीण भागातील महिला व पुरुषांना पिण्याच्या पाण्याकरिता दोन दोन किलोमीटर दूर जावे लागते. तरी त्यांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळत नाही, अशी विदारक सामाजिक स्थिती विशद केली. म्हणून पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. तसेच पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून तेच पाणी शेतीच्या पीक लागवडीकरिता कसे उपयोगात आणता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.

                     कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. लीलाधर खरपुरिये यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद करताना पृथ्वीवर ७१% पाणी असून २९ टक्के जमीन आहे. या ७१% पाण्यापैकी फक्त २ टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे. कारण 98 टक्के पाणी हे खारे आहे. तसेच पिण्यायोग्य २ टक्के पाण्यापैकी १ टक्का पाणी नदी, नाले यांच्या माध्यमातून वाहून जात असते. म्हणजेच उरलेल्या १ टक्के पाण्यामध्येच आपल्याला आपल्या गरजा भागवायच्या असतात. तेव्हा पाण्याचे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे असे विचार मांडले. नंतर विद्यार्थ्यांना पाणी बचती संदर्भात शपथ देण्यात आली.

                       कार्यक्रमाला डॉ. प्रमोद वडते, डॉ. धनंजय देवते, डॉ. अल्का थोडगे, प्रा. सचिन काळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. सिद्धार्थ चणकापुरे, यांचेसह संजय गणोरकर, शुभम वाघ, चैतन्य सुपले, अजय अंजनकर, प्रदीप बगडे, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीन क्लबची सदस्य कु. आर्या कळसाईत हिने केले. आभार कु. मेहक शेख हीने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News