बोअरवेल साहित्याचा ट्रक उलटला, कामगाराचा दबून मृत्यू – तिघे जखमी 

कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहपानजीकची घटना, 

काटा वृत्तसेवा 
नागपूर/ कळमेश्वर: वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेला ट्रक लगतच्या शेतात शिरला आणि उलटला. या अपघातात एका कामगाराचा केबिनमध्ये दबल्याने जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक कामगार गंभीर व दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहपा नजीकच्या खुर्सापार शिवारात सोमवारी (दि. २१) पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
                        झिरकू बाबूलाल सेलूकर (२३), रा. शहापूर, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश, असे मृताचे नाव असून, राजन दादू बग्गा, रा. सिद्धी, मध्य प्रदेश व जारकू उईके, रा. खापा, जिल्हा बैतूल मध्य प्रदेश अशी किरकोळ जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी कामगाराचे नाव कळू शकले नाही. सर्व जण बोअरवेलची कामे करायचे. त्यांनी सोमवारी सावरगाव (ता. नरखेड) येथे बोअरवेल केल्यानंतर एमएच-१२एचडी-९७३९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये बसून लोहगड, बुधला मार्गे मोहपा (ता. कळमेश्वर) येथे बोअरवेल करण्यासाठी जात होते.
                       या ट्रकमध्ये बोअरवेल खोदायला लागणारे मोठे व जाडे पाइप तसेच इतर लोखंडी साहित्य होते. झिरकू हा केबिनमध्ये ट्रकचालकाच्या मागच्या सीटवर तर अन्य तिघे मागच्या भागाला ठेवलेल्या साहित्यावर बसले होते. बुधला शिवारातील वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेला हा ट्रक रोडलगतच्या शेतात २० मीटर आत जाऊन उलटला. ट्रकची चाके पूर्णपणे वर झाल्याने चारही कामगार जखमी झाले. अपघात होताच चालकाने ट्रक सोडून पळ काढला.
                      माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत जिरकूचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलीसांनी तिन्ही जखमींना उपचारासाठी तर जिरकूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. प्रथमोपचारानंतर गंभीर जखमीला नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. किरकोळ जखमीवर कळमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी ट्रकचालक विजयपाल उईके (२३, रा. पवार झेंडा, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कामगार केबिनमध्ये फसला:

                     झिरकू ट्रकचालकाच्या मागच्या सीटवर बसला असल्याने ट्रक उलटताच तो आत फसला होता. जखमी अवस्थेत त्याला बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याला मृत्यू झाला. हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. त्यांनी क्रेनच्या मदतीने केबिनचा काही भाग तोडला आणि त्याला बाहेर काढले.

अरुंद रोड आणि धोकादायक वळण:

                      हा रोड अरुंद असून, बुधला शिवारात या रोडला धोकादायक वळण आहे. या वळणावर चालकांनी त्यांच्या वाहनांचा वेग कमी करावा, यासाठी गतिरोधक किंवा पांढरे पट्टे नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वेगात असलेल्या वाहनांच्या चालकांचा ताबा सुटतो आणि वाहन शेतात शिरून अपघात होतो. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी गुरांची अवैध वाहतूक करणारी रुग्णवाहिका उलटली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News