संजय सावकारे यांची उचलबांगडी,
पंकज भोयर यांच्याकडे दिली जबाबदारी
भंडारा : महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. यापूर्वी पालकमंत्री असलेले भाजप नेते आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी आता राज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन झाले असून, त्यांना आता बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
उपसचिव दिलीप देशपांडे यांनी सोमवारी रात्री काढलेल्या शासन आदेशानुसार, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. या निर्णयामागे तत्कालीन पालकमंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये असलेली तीव्र नाराजी हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. सावकारे हे पालकमंत्री असूनही केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांपुरतेच जिल्ह्यात येत असल्याने, स्थानिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत होते. यामुळे, नागरिकांकडून स्थानिक पालकमंत्र्यांची मागणी केली जात होती.
या पार्श्वभूमीवर, सावकारे यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी वर्धा जिल्ह्याचे असलेले पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे, जेणेकरून स्थानिक प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले जाईल.
तसेच सावकरे हे जळगाव जिल्ह्यातून येत होते. त्यामुळे अनेकवेळा भंडाऱ्यात वेळ देण्यात ते कमी पडले आणि यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ताकद वाढायला लागली होती. आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.