पुणे :सोलापूर- पुणे महामार्गावर यवत परिसरात खामगाव गावाचे हद्दीत हॉटेल साई मसळ समोर २७ फेब्रुवारी रोजी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सागर जयसिंग कदम (वय- २८, रा. माहाीजळगाव, ता. कर्जत, आहिल्यानगर ) यास ‘तू मयुरीशी लग्न केले तर तुला दाखवतो’ असे म्हणत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.
यवत पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करत मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडून त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर मारहाण झालेल्या तरुणाच्या भावी पत्नीनेच तो पसंत नसल्याने लग्न न करण्यासाठी त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दीड लाख रुपयांची सुपारी आरोपींना दिली होती, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी तरुणीच्या पाच साथीदारांना अटक केली असून महिला आरोपी अद्याप फरार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.
मयुरी सुनिल दांगडे (रा.श्रीगोंदा, आहिल्यानगर), आदित्य शंकर दांगडे (१९,), संदीप दादा गावडे (४०, दोघे रा. गुघलवडगाव, ता.श्रीगोंदा, आहिल्यानरग), शिवाजी रामदास जरे (रा.३२,रा.पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा, आहिल्यानगर), इंद्रभान सखाराम कोळपे (३७,रा. पिंपळगाव पिसा, आहिल्यानगर), व सुरज दिंगबर जाधव (वय- ३६,रा. काष्टी, ता.श्रीगोंदा, आहिल्यानरग) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींचे ताब्यातून वेरणा कंपनीची एक कार व लाकडी दांडके जप्त करण्यात आले आहे. याबाबत यवत पोलिस ठाण्यात हॉटेल कुक म्हणून काम करणाऱ्या सागर कदम यांनी तक्रार दाखल केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या कारवर पाठीमागील नंबर प्लेटवर ‘महाकाल’ असे लिहलेला मजकुर मिळाला होता. गाडीचा क्रमांक आधारे आरोपीचे नाव निष्पन्न करुन संशयित आरोपी आदित्य दांगडे यास अटक करण्यात आली. त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर त्याने मयुरी दांगडे व संदीप गावडे यांच्या सांगण्यावरुन मयुरीला होणारा नवरा सागर हा पसंत नसल्याने दीड लाख रुपयांची सुपारी घेतली. आदित्य दांगडे याने त्याचे साथीदार शिवाजी जरे, इंद्रभान कोळपे, सुरज जाधव यांच्यासह मयुरी दांगडे हिचा होणारा नवरा सागर कदम यास मारहाण केल्याचे कबुल केले. त्यामुळे संबंधित आरोपी यांनी खुनाचा कट रचून सागर कदम यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने सोलापूर- पुणे महामार्गावर अडवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याने गंभीर दुखापत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महिला आरोपी मयुरी दांगडे ही अद्याप पसार असून तिचा शोध पोलिस करत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करत आहे.