♦ राज ठाकरेंचा पुन्हा एकदा ‘लाव रे व्हिडिओ’
♦ गंगेच्या भीषण प्रदूषणाचे व्हिडिओ दाखवले
♦ कुंभमेळ्याला आलेल्या आकडेवारीवर राज ठाकरेंचा सवाल
मुंबई : प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. ज्यावेळेला गंगेवरच्या या सगळ्या गोष्टी पाहत होतो, त्यावेळी मला कळेना हे कसे काय चालले. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले. म्हणजे अर्धा भारत आला का? असे म्हणत राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याला आलेल्या आकडेवारीवर सवाल उपस्थित केला. त्यातील 5 लाख आपण व्हिआयपी आणि व्हिव्हिआयपी पकडू. बाकीचे काठावरच बसले असतील. प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली, तर चीनची भिंत बांधता आली असती, असे राज ठाकरे म्हणाले.
देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे?
ही गंगेची परिस्थिती आहे. आतापर्यंत 33 हजार कोटी रुपये खर्च झाले त्यावर. नुसते अग्नी दिल्यासारखे करतात आणि तसेच प्रेत पाण्यात ढकलून देतात. हा कोणता धर्म? देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे? असा सवाल राज ठाकरे यांची केला. आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा करायला नको का? असेही ते म्हणाले. काळ बदलला, लोकसंख्या वाढली. हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हे सर्व विधी करण्यासाठी वेगळ्या घाटावर एखादी जागा करता येत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
गंगेत अंघोळ केल्यानंतर अनेक जण आजारी पडले – राज ठाकरे
निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे आणि शुभेच्छांचे अनेक फोन नेमके आजच आले. आज का आले? याचा अर्थ मला समजतो. गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या? त्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
त्यातील पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणले. मी ते पिण्यास नकार दिला. नव्याने वारे शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटले मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? आपल्या देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. जिला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्या नद्यांकडे आजचे राज्यकर्ते नाही, खूप वर्षांपासूनचे गंगा साफ करावी, असे बोलणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजीव गांधी. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी गंगा साफ करण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून अजून गंगा साफ करत आहेत. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनीही गंगा साफ करणार असे सांगितले.
आपल्याकडील देशामधील नद्यांची अशी अवस्था आहे की, पाणी पिणे लांबची गोष्ट, तुम्ही अंघोळ करू शकत नाहीत. माझ्याकडे उत्तरेतील लोक येऊन गेले. त्यांनी सांगितले की, कित्येक लाखो लोक इथे अंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत. प्रश्न हा गंगेच्या, कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये. तर प्रश्न हा पाण्याच्या स्थितीचा आहे. कशाप्रकारचे पाणी तिथे असते, होते. त्या गोष्टी अजूनही थांबवले जात नाही, असे राज ठाकरे म्हणाले. एका मिनिटासाठी गंगेची स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला दाखवतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी गंगा नदीचा एक व्हिडिओ दाखवला.
ईव्हीएमवरून राज ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मते दिसली. त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करून देखील ईव्हीएममध्ये त्यांची मते दिसली नाहीत, त्यांचेही मी आभार मानतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरून निशाणा साधला. निवडणुका कशा झाल्या? काय काय गोष्टी घडल्या? यावर माझे बोलून झालेले आहे. आता जे झाले ते झाले. आता यापुढचे बघायचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का? उद्धव ठाकरेंना सवाल
मनसेने गुढीपाडवा मेळाव्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता बाळासाहेबांच्या फोटोशिवाय कुणाला पुढे जाताच येत नाही असे म्हणत राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेवर संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला. कुणीतरी एक फोटो लावला, तर उद्धव ठाकरेंच्या एवढे मनाला लागले. बाळासाहेब हे तुमचे आहेत, तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. असेल, तर हा अख्खा हजार कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे आणि कुणीतरी बॅनरवर फोटो लावला तर बाळासाहेब तुमचे. हा कुठला दुटप्पीपणा, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
