विश्वातील सर्वात सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व ‘महात्मा गांधी’
चांदूर बाजारच्या भक्तिधाम येथे डॉ. सतीश तराळ यांचे प्रतिपादन
चांदूर बाजार : गांधीजींचा आचार हाच गांधीवाद आहे. गांधीवादाचा संपूर्ण जगावर प्रभाव आहे. गांधीवाद धार्मिक, अध्यात्मिक मानवतावाद आहे. महात्मा गांधी हे विश्वातील सर्वात थोर व्यक्तीमत्व व गांधीवाद जगातील अभूतपूर्व वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी असल्याचे प्रतिपादन साहित्यिक डॉ. सतीश तराळ यांनी केले.
गांधी जयंतीनिमित्त येथील गुलाबराव महाराज सेवा संस्थान (भक्तीधाम) येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले होते तर अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सतीश मोहोड उपस्थित होते. डॉ. सतीश तराळ पुढे म्हणाले अमेरिकेचे जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स यांनी १९२० सालीच गाधींचा उल्लेख जगातील सर्वात महान व्यक्ती असा केला होता, तर विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी गांधींना युगातील सर्वश्रेष्ठ माणूस संबोधले होते. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता तर रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचा उल्लेख ‘महात्मा’ असा केला.

जगातील मोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ सर्वांवरच गांधींचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील लेखकांनी व विचारवंतांनी गांधीजींवर प्रचंड अन्याय केला. विनोबा आणि साने गुरुजी गांधींचा विचार आत्मसात करून लिहिणारे लेखक आहेत. गांधीजींनी आत्मज्ञानाची वरची पातळी गाठली होती. ते जगाचे स्फूर्तीदाते होते. गांधी हे स्थलकालातील व्यक्तिमत्व आहे.
विश्वात राष्ट्रीयत्वाची व देशभक्तीची भावना निर्माण करण्यात गांधींचा वाटा महत्त्वाचा आहे. एकादशव्रत, असहकार, सर्वोदय, सत्याग्रह ही गांधींची विश्वाला देणे आहे. अहिंसेने स्वातंत्र्य मिळवणारे ते विश्वातील एकमेव लोकनेते आहेत. सर्व वैश्विक समस्यांची उत्तरे गांधीवादात आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. केशव ठाकरे यांनी केले. संचालन ममता इंगोले यांनी तर आभार महानंदा खाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Users Today : 2
Users Yesterday : 11