August 15, 2025 7:37 am

महाराष्ट्रावर सूर्याचा प्रकोप, तापमान आणखी वाढणार :  हवामान विभागाचा अंदाज

अकोल्यात सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद

नागपूर : महाराष्ट्रात सूर्य आग ओकू लागला असून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस आलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अकोल्यात गेल्या दोन दिवसांपासून 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, मात्र आज हेच 43.2 वर गेल्याचे पाहायला मिळाले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होणार असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही उष्णतेच्या तीव्र लाटा सुरू राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूर महापालिकेने देखील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता अलर्ट जारी केला आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी नागपूर महापालिकेने हीट अॅक्शन प्लॅन तयार केला आसून शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तसेच बेघरांना शेल्टर हाऊस आणि इतर हॉटस्पॉट भागांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हवामान विभागाचा अंदाज …

                      हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे, त्यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रावरून आलेले अवकाळी वादळ आता पुन्हा दक्षिणेकडे सरकले असून, उत्तरेकडे नव्याने एक पश्चिमी विक्षोभ तयार होत आहे. यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
                      दक्षिण आणि उत्तर भारतात अवकाळी पावसाचा धोका असताना, महाराष्ट्रात मात्र उष्णतेची तीव्रता वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांत कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक ठिकाणी तापमान चाळिशीच्या पुढे गेले आहे आणि अशा परिस्थितीत वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांकडून करण्यात येत आहे.

कोणत्या शहरात किती तापमानाची नोंद

                     अकोला 44.2 , अमरावती 43.6, यवतमाळ 42, वर्धा 42, नागपूर 42.4, चंद्रपूर 43.6, गोंदिया 40.6. तर जळगाव आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात 42.8 अंश सेल्सिअस अशी नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात आज सर्वाधिक तापमान परभणीत नोंदवले गेले. 40.7 तापमानाची नोंद आज परभणीत झाली आहे. छत्रपती संभाजी नगर 40.2 अंशावर आहे. लातूर धाराशिव मध्ये 39.2 अंश सेल्सिअस तापमान आहे. पुण्यात आज 39.2 अंश सेल्सिअस तापमान होते. तर सोलापुरात 41.4. नाशिक 40.2 सांगली कोल्हापूर सातारा 38 ते 38.5 अंश ठाणे पालघर 37 व 36 अंश सेल्सिअस वर होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News