का टा प्रतिनिधी : नागपूर, दि.२३ : महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर 10 युवकांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध सामूहिक अत्याचार, पीटा ॲक्ट आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत 6 आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींपैकी दोघे नागपुरातील तर चार आरोपी यवतमाळचे आहेत. न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस कसून शोघ घेत आहे.
पीडित मुलगी साडेसतरा वर्षांची असून ती एका महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला आहे. गत 11 जुलै रोजी ती अचानक घरुन निघून गेली. पालकांच्या तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांनी तिला 3 तासातच शोधून पालकांच्या ताब्यात दिले. मात्र 16 जुलै रोजी ती पुन्हा बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान नागपुरातील दोन मित्रांच्या ती संपर्कात आली. ते तिला निर्जन स्थळी घेवून गेले. तिच्यावर अत्याचार केला नंतर सोडून दिले. त्याच दिवशी ती यवतमाळला गेली. अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक तिचा शोध घेत होते. ती यवतमाळच्या मादणी येथे असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. पीडित मुलीचे कुटुंब आणि हुडकेश्वर पोलिस 18 जुलै रोजी यवतमाळला गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले आणि त्याच दिवशी नागपुरात परतले.
पीडितेने महिला अधिकार्यासमोर आपबीती सांगितली. पोलिसांनी तिचे बयान नोंदवून घेतले. त्यावरून सामूहिक अत्याचार, पीटा ॲक्ट आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. व- पो- नि- भेदोडकर यांच्या पथकाने चोवीस तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. नागपुरातील दोन आणि यवतमाळातील चार असे 6 आरोपी अटक केले. त्यांना न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी किती आरोपी आहेत. याचा पोलिस तपास करीत असून लवकरच उर्वरीत आरोपींनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती वपोनि भेदोडकर यांनी दिली.
जवळपास वर्षभरापूर्वी पीडितेची यवतमाळच्या एका तरुणाशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि बोलचाल सुरू झाली. आरोपी तरुणाने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने तिला भेटण्यासाठी यवतमाळला बोलाविले. 16 जुलै रोजी ती त्याच्याकडे गेली. तो तिला मादणी येथे मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. तत्पूर्वी त्याने इतर मित्रांनाही याबाबत माहिती दिली होती. तेथे चैघांनी मिळून पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता मारहाणही केली.