महिला डॉक्टरची आत्महत्या : पोलिस इन्स्पेक्टरने चारदा बलात्कार केला
फलटणमधील हृदयद्रावक घटना – सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप
रक्षकच भक्षक बनले तर न्याय कसा मिळणार? काँग्रेसचा सवाल
मुंबई : २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या तळहातावर दोन नावे लिहिली होती – एक उपनिरीक्षक गोपाळ, ज्याने तिच्यावर ४ वेळा बलात्कार केला आणि दुसरा प्रशांत, जो ५ महिन्यांपासून छळ करत होता. आता चार पानांची सुसाईड नोट देखील समोर आली आहे, ज्यामध्ये एका खासदार आणि त्यांच्या पीएवरही आरोप आहेत. या एका मृत्यूने संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेली एका महिला डॉक्टरची आत्महत्या केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अंतर्मुख करणारी घटना ठरली आहे.कर्तव्यनिष्ठ, रुग्णसेवेसाठी समर्पित आणि आपल्या कार्यात निष्ठावान असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करून जीवनाचा अंत केला. परंतु त्यांच्या मृत्यूने उभे केलेले प्रश्न प्रत्येक संवेदनशील नागरिकाला हादरवणारे आहेत.
![]()
हातावर लिहिलेली सुसाईड नोट — पोलिसांवर गंभीर आरोप
घटनास्थळी डॉक्टरांच्या हातावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. मुंडे यांनी लिहिले आहे की, “पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर बलात्कार केला आणि पोलीस प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केला.”या थरारक खुलाशामुळे सातारा जिल्हा तसेच संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
“तक्रारी केल्या पण दखल घेतली नाही”
मृत डॉक्टरने या छळाबाबत काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठांना लेखी तक्रार केली होती.
त्यात त्यांनी नमूद केले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे; हा त्रास चालू राहिला तर मला आत्महत्या करावी लागेल.” मात्र, या पत्राची दखल घेतली गेली नाही. परिणामी अखेर त्यांनी अत्यंत निराशेतून टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
समाज, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला प्रश्न
ही घटना फक्त एका डॉक्टर महिलेच्या मृत्यूची नाही; तर कार्यस्थळी महिलांना भेडसावणाऱ्या अन्याय, छळ आणि दबावाच्या गंभीर वास्तवाचे प्रतीक आहे.
राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून, संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दोन्ही पोलिस अधिकार्यांना निलंबित करण्याचे निर्देश देत, “महिलांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला आहे.
वैद्यकीय क्षेत्राचा आक्रोश
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) ने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “डॉ. मुंडे यांना दीर्घकाळ मानसिक छळ सहन करावा लागला. त्यांनी अनेकदा वरिष्ठांना कळवले, तरी कोणी ऐकले नाही. अशा दुर्लक्षामुळे आणखी किती जिवं गमवावी लागणार?”
वैद्यकीय संघटनांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्याबाबत ठोस धोरण राबवण्याची मागणी केली आहे.
![]()
“हा प्रश्न एका डॉक्टरचा नाही” — सुषमा अंधारे
राजकीय कार्यकर्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “ही घटना केवळ एका डॉक्टर महिलेची नाही, तर कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या मानसिक आणि लैंगिक छळाच्या सर्वव्यापी समस्येचे प्रतिबिंब आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत घेतल्या असत्या, तर आज एक तरुण डॉक्टर आपल्यात असती.”
अंतर्मुख होण्याची वेळ
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने समाजातील असंवेदनशीलतेचे, प्रशासनातील उदासीनतेचे आणि महिलांच्या सुरक्षेबाबतच्या गंभीर दुर्लक्षाचे दर्शन घडवले आहे. आज प्रत्येक कार्यस्थळी महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे केवळ कायद्याचे नव्हे, तर मानवतेचे कर्तव्य आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे, “एक संवेदनशील आणि न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आपण खरोखर किती तयार आहोत?”
![]()
रक्षकच भक्षक बनले तर न्याय कसा मिळणार? काँग्रेसचा सवाल
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे अवघ्या महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील आरोपी पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने मृत महिलेवर एकदा नव्हे तर तब्बल 4 वेळा बलात्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांचे काम हे रक्षण करण्याचे असते. पण तेच महिला डॉक्टरचे शोषण करत असतील, तर न्याय कसा मिळणार? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
साताऱ्यातील फलटम उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. सदर डॉक्टरने आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात तिने आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत पोलिसांच्याही कर्तव्यपरायणतेवर सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे, पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिला.
पोलिसांवर कारवाई होईपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत
पोलिसांचे काम हे रक्षण करण्याचे आहे पण तेच जर महिला डॉक्टरचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा? या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही? महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे, त्यातूनच पोलिस अत्याचार वाढत आहे. या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही. या पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे, नाही तर तपासावर ते दबाव टाकू शकतात. आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली. आधी, कोणी दुर्लक्ष केले, या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही, असे ते म्हणालेत.
![]()
![]()
![]()