“पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा”,
तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
भोंदूबाबासह पाच आरोपी अटकेत, मोठे सेक्स रॅकेट असण्याची शक्यता
काटा वृत्तसेवा
नागपूर: पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने मध्यरात्री नग्नपूजेचे नाटक केले. त्यादरम्यान तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात एका महिलेचादेखील समावेश आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी या प्रकरणात गुप्तता राखली असून आरोपींची नावे उघड करण्यासदेखील अधिकार्यांनी नकार दिला आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
तीन दिवसांअगोदर हा प्रकार घडला. यात भोंदूबाबा असलेला कदीलबाबा हा मुख्य आरोपी आहे. कदीलबाबाचे मूळ नाव अब्दुल कादीर असून तो मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तर आशिष नावाचा आरोपी हा कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणारी महिलादेखील यात आरोपी आहे. आशिष व संबंधित महिलेने शाॅर्टकट पद्धतीने पैसे मिळविण्यासाठी कदीलबाबाला संपर्क केला. जर मध्यरात्री नग्नपूजा केली तर पैशांचा पाऊस पडेल व रात्रभरात मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील, असा कदीलबाबाने दावा केला. मात्र नग्नपूजेसाठी अल्पवयीन मुली लागतील, असे त्याने सांगितले. आशिष व महिलेने दोन साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन मुलींचा शोध सुरू केला.
या चारही आरोपींनी गरीब घरातील तीन अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून पूजेसाठी तयार केले. सुरुवातीला केवळ काही कपडे काढावे लागतील अशीच आरोपींनी बतावणी केली होती.
पैशांची गरज असल्याने तीनही मुली तयार झाल्या. रविवारी रात्री मानकापूर श्पोलिस ठाण्याच्या हद्दीत कदीलबाबाच्या घरी सगळे पोहोचले. मध्यरात्री कदीलबाबाने पूजेचे ढोंग सुरू केले. त्यादरम्यान त्याने बहुदा मुलींना गुंगीचे औषध दिले.
त्यानंतर त्याने तिघींवरही अत्याचार केला. दुसर्या दिवशी सकाळी हा प्रकार समोर आल्यावर मुली हादरल्या. पैशांचा पाऊस करण्याची बतावणी ढोंग असल्याची बाबदेखील स्पष्ट झाली. मुलींनी त्यांच्या एका परिचित तरुणाला हा प्रकार सांगितला. तो त्यांना घेऊन मानकापूर पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी या प्रकरणात लगेच गुन्हा दाखल केला व अब्दुल कादीर-आशिषसह पाचही आरोपींना अटक केली आहे.
कदीलबाबाकडून अत्याचाराचे रॅकेट ?
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अतिशय गुप्तता बाळगली आहे. कदीलबाबाने या अगोदरदेखील असा प्रकार केला आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपींची मुलींचा शोध घेण्यासाठी मदत घेण्यात आली होती. मात्र अंधश्रद्धेचा फायदा उचलत कदीलबाबा व आशिषने अगोदरदेखील असे प्रकार केले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात काहीही बोलण्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी नकार दिला.
पाचही आरोपींना पोलिस कोठडी
पाचही आरोर्पीना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले व न्यायालयाने त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तीनही मुली अल्पवयीन असल्याने प्रकरण संवेदनशील झाले आहे. या अत्याचाराचे व्हिडीओ रेकाॅर्डिंग वगैरे करण्यात आले आहे का याचादेखील पोलिस तपास करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर आक्रमक
या अत्यंत निंदनीय, दुर्दैवी घटनेचा महाराष्ट्र अनिस राज्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येवून प्रेस नोट प्रसिद्धीस दिली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूरच्या वतीने मानकापूर पोलिस स्टेशन ला भेट देऊन घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून कसून चौकशी करून आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई, करण्याची मागणी तसेच यापूर्वीही अश्या घटना अटकेतील गुन्हेगारांनी घडवून आणल्या आहेत काय? हे सुद्धा तपासून पहाण्याची मागणीे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. ‘‘पैशाच्या पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्न पूजेच्या नावाखाली तीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार’ केल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत निंदनीय, दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा महाराष्ट्र अनिस नागपूर व राज्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येते.
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा सदैव प्रयत्नरत आहे. जादूटोणाविरोधी कायदयाचा प्रचार, प्रसार आणि अमलबजावणी करीता शहरात तसेच जिल्ह्यातील ग्रामिण वेगवेगळ्या भागातून कार्यक्रम घेऊन जनजागृती करीत असते. आता सुद्धा प्रकरण घडलेल्या परिसरात, व नागपूर जिल्ह्यात कार्यक्रम घेऊन जनतेला कायद्याचे मार्गदर्शन व माहिती देण्यात येईल असे महाराष्ट्र अंनिस तर्फे राम डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी जाहीर केले. या वेळी एस. एन. उके गोधनी, अशोक राऊत, रमेश जवळे, वर्षा सहारे उत्तर नागपूर शाखा, विजयाताई ठाकरे कार्याध्यक्ष पश्चिम नागपुर शाखा, इंदू उमरे दक्षिण नागपूर शाखा उपस्थित होते.



