मुंबई महापौर: महायुतीचाच होणार, शिंदे-फडणवीस ठरवतील
पुणे : मुंबई महानगरपालिकेवर २५ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली असून, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने ११८ जागांसह बहुमत मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार हे ते व एकनाथ शिंदे यांच्यासह ठरवतील.
फडणवीस म्हणाले, “वरच्या देवाने ठरवले की महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे आमचाच महापौर होईल. मुंबईचा महापौर कुणाला करायचा हे शिंदे आणि आम्ही मिळून ठरवू. आमचे नेते मंडळी सगळे बसून निर्णय घेतील, त्यात कोणताही वाद येणार नाही.”
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानावरही टोला लगावला. ठाकरे म्हणाले होते की “देवाच्या मनात असेल तर मुंबई आपला महापौर होईल,” त्यावर फडणवीस म्हणाले, “देवाच्या म्हणजे माझ्या की, वरच्या देवाच्या? वरच्या देवाने ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा.”
मुंबईत भाजप युतीला मिळालेल्या ११९ जागांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “जवळपास आमच्या १४ जागा अतिशय कमी मतांनी हरल्या. एवढ्या जागा एकत्रित शिवसेनेला कधी मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलो आहोत.” त्यांनी संजय राऊत आणि शिंदे गटावरही टोला लगावला.
![]()
शिंदे गटाच्या कामगिरीवरही फडणवीस म्हणाले, “आमच्यासारखेच त्यांचे काही जागा कमी मतांनी गेल्या. ते पहिल्यांदाच अशा प्रकारे निवडणूक लढवत होते. अपेक्षा जास्त होत्या, पण काही जागा कमी मतांनी गेल्या.”
मनसेला या निवडणुकीत “बिगेस्ट लूझर” ठरल्याचे फडणवीस यांनी सांगितले आणि राज ठाकरेंना देखील टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते. यावर फडणवीस म्हणाले, “मतदानाच्या दिवशी रात्री अजित पवार माझ्याकडे येऊन गेले. त्यांनी सांगितले की राज्यपाल महोदय येणार आहेत, त्यामुळे मी मंत्रिमंडळाला बैठकीला येऊ शकणार नाही.”