भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उकारा फाट्याजवळ शुक्रवारी (३१ मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीने एका काळीपिवळीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जितेंद्र रविंद्र उपराळे (२८, रा. मोहनटोला, ता. आमगाव, जि. गोंदिया) आणि यादवराव गोपाल वघारे (३६, रा. आमगाव, जि. गोंदिया) अशी अपघातात मृतांची नाव आहेत. हे दोघे मोटारसायकल (क्रमांक एमएच ३५ एएम ०६७०) वरून देवरीकडून साकोलीकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
घटनेच्या वेळी आरोपी निखील करूणाकर गजभिये (३०, रा. साकोली) हा टाटा मॅजिक काळीपिवळी (क्रमांक एमएच ३५ के १५४३) वाहन चालवत होता. त्याने रस्त्याच्या मधोमध निष्काळजीपणे व अचानक लेंन बदलल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या मोटारसायकल चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे मोटारसायकल टाटा मॅजिक वाहनास पाठीमागून जोरात धडकली.
या धडकेत मोटारसायकलच्या मागे बसलेला यादवराव वघारे रस्त्यावर फेकला गेला आणि जागीच मरण पावला. तर चालक जितेंद्र उपराळे याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.