February 7, 2026 4:06 am

मोहपा येथे महावितरण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मोहपा येथे महावितरण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कर्मचाऱ्यांनी शिस्त, कर्तव्य आणि राष्ट्रसेवेचा घेतला निर्धार

मोहपा : मोहपा शहरातील महावितरण कार्यालय, मोहपा ग्रामीण १ व २ कार्यालये तसेच मोहपा ३३ केव्ही उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपकार्यकारी अभियंता मिलिंद राणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांचे सामूहिक गायन करून राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मिलिंद राणे यांनी सांगितले की, दैनंदिन कामकाजात शिस्तीचे पालन करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. देशाने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य जपणे, ते टिकवून ठेवणे आणि लोकहितासाठी काम करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, तसेच जबाबदारीने व पारदर्शकतेने आपली कर्तव्यपूर्ती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थित नागरिकांनीही या मार्गदर्शनाचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार व मिठाईचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश देत प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0
0

Leave a Reply

Realted News