August 15, 2025 11:09 am

म्यानमारमध्ये भूकंप – 10 हजार लोकांच्या मृत्यूची भीती

बँकॉकमध्ये 30 मजली इमारत कोसळली,

154 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी; 110 लोक ढिगाऱ्याखाली

नायपिडॉ : म्यानमारमध्ये शुक्रवारी सकाळी ११:५० वाजता, ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह पाच देशांमध्ये त्याचे धक्के जाणवले. म्यानमार आणि थायलंडमध्ये १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
                     या भूकंपात मृतांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने व्यक्त केला आहे. तथापि, म्यानमारच्या लष्करी सरकारने आतापर्यंत किमान १४४ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, तर ७३२ लोक जखमी झाले आहेत.
                      त्याच वेळी, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली. या साईटवर ४०० लोक काम करत होते. यापैकी ११० लोक बेपत्ता आहेत. थायलंड सरकारने आतापर्यंत १० जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे थायलंडचे पंतप्रधान पिथोंगटार्न शिनावात्रा यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

पहिल्या भूकंपाच्या १२ मिनिटांनंतर ६.४ तीव्रतेचा आफ्टरशॉक आला

                      म्यानमार, थायलंड, बांगलादेश, भारत आणि नैऋत्य चीनसह ५ देशांमध्ये याचा परिणाम दिसून आला. येथील अनेक भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील कोलकाता, इंफाळ, मेघालय आणि ईस्ट कार्गो हिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ढाका, चितगावसह बांगलादेशातील अनेक भागांना ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. बारा मिनिटांनंतर, म्यानमारमध्ये ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का बसला.
                       म्यानमारमध्ये रात्री उशिरा ४.२ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला. २८ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ११.५६ वाजता म्यानमारमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला.
                       भारतीय हवाई दलाच्या C130J विमानाने हिंडन हवाई दल तळावरून म्यानमारसाठी उड्डाण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपग्रस्त म्यानमारला पाठवण्यात येणाऱ्या १५ टन मदत साहित्यात तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट, तयार अन्न, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौर दिवे, जनरेटर सेट आणि आवश्यक औषधे यांचा समावेश आहे.

म्यानमारच्या लष्करी सरकारने मदत मागितली

                        पहिल्यांदाच, म्यानमारच्या लष्करी सरकारने भूकंप मदत कार्यासाठी जगभरातून मदतीचे आवाहन केले आहे. २०२१ पासून सत्तेत असलेल्या लष्करी सरकारच्या काळात येथे ६.२ आणि ६.४ तीव्रतेचे मोठे भूकंप झाले आहेत.
थायलंडमधील सर्व एक लाख भारतीय पर्यटक सुरक्षित  
                         थायलंडमधील सर्व एक लाख भारतीय पर्यटक सुरक्षित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने +66 618819218 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाधित लोकांच्या आरोग्यासाठी मदतीची घोषणा केली. मोदी ३ एप्रिल रोजी थायलंडमध्ये होणाऱ्या बिमस्टेक संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News