August 15, 2025 7:31 am

रसायनयुक्त दूषित पाण्याने ‘वरोडा’ गावावर भीतीचे सावट

दूषित पाण्याचा विरोधात तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

सरपंच संगिता वासनिक, आक्रमक 

काटा वृत्तसेवा I इरशाद दिवाण
कळमेश्वर : तालुक्यातील कळमेश्वरसह वरोडा, झुनकी, सावळी, सिंदी, धुरखेडा, बोरगाव येथील नागरिक हजारोंच्या संख्येत रसायन युक्त दूषित पाण्या विरोधात आंदोलनासाठी सज्ज असून सात दिवसात दुषित पाण्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

                       गावालगत वाहणाऱ्या मोरधाम नदीच्या पात्रात कळमेश्वर एमआयडिसी तील कंपन्यांमधून रसायनयुक्त दूषित पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून समोर आला आहे. परिणामी, नदीचे पाणी काळे, विषारी, दूर्गंधीयुक्त व फेसाळलेले झाले असून, पाणी पूर्णतः दूषित झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधितांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करूनही अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही. याच् नदिच्या पात्रात गावाची पाणीपुरवठा योजना असून नागरिकांना हेच दुषीत पाणी प्यावे लागत आहे.

                      हेच पाणी जनावरे व नागरिक पिण्यास वापरत असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पाण्यात हा बदल जाणवू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

                       नागरिकांच्या जीवावर उठलेल्या दोषी कारखान्यावर कठोर कारवाईची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. शासनाने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून पिण्याचे पाणी जाणिवपूर्वक विषारी केल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
                        कळमेश्वर एमआयडीसीतील कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या रसायन युक्त दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, शासनाने संबंधीत प्रदूशण नियंत्रण मंडळासह सर्व विभागांनी ग्रामवासियांच्या सहनशिलतेचा कृपया अंत पाहू नये. अशी आग्रहाची विनंती, वरोडा ग्रामपंचायतच्या सरपंच संगिता वासनिक, उपसरपंच हिरालाल डाखोळे, घनश्याम खडसे, मिलिंद राऊत, गीता हिवरे, सुनीता घोरगडे, प्रतिभा काकडे, पुंडलिकराव बांबल, शांताराम हिवरे,  सावंगीचे सरपंच प्रवीण राऊत, खुशाल खडसे, प्रमोद काकडे इ. सह शेकडो नागरिकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News