कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
मुंबई : राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संविधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते परंतु दुर्देवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री आणि मंत्री यांची वर्तणूक संविधानविरोधी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन नागपूर हिंसाचारासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सविस्तर निवेदन दिले. या शिष्टमंडळात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, आमदार विकास ठाकरे, आमदार राजेश राठोड, आमदार संजय मेश्राम, आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह नेते उपस्थित होते.











Users Today : 2
Users Yesterday : 11