February 7, 2026 8:41 am

‘राष्ट्रसंतांना आदरांजली’ : नागपूर विद्यापीठाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ 

 

‘राष्ट्रसंतांना आदरांजली’
‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे’ गीताचे सामूहिक गायन
नागपूर विद्यापीठाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ 
का टा वृत्तसेवा I नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे…’ या विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ची नोंद केली. या ऐतिहासिक विक्रमाद्वारे विद्यापीठाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमात विद्यापीठाने एकूण चार विश्वविक्रम प्रस्थापित केले.
                       हा विश्वविक्रमी कार्यक्रम शनिवारी जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.

                      यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आजही प्रासंगिक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख, कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दनपंत बोथे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षक इंग्लंड येथील इमा ब्रेन, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे श्री मिलिंद वेर्लेकर, संजय नार्वेकर व सुषमा नार्वेकर, तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. मनोज तत्ववादी यांचीही उपस्थिती होती.
                      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी विक्रमी प्रतिसाद दिला. अतिशय कमी वेळेत प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ५२ हजारांपेक्षा अधिक नोंदणी केली. यामध्ये १६ हजारांपेक्षा अधिक प्रत्यक्ष उपस्थिती होती, तर १५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभाग नोंदवला.
                       विद्यापीठाने ‘एकच गाणे गाणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन व्हिडिओ अल्बम’ या प्रकारात ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदविला. यापूर्वी ५ हजार लोकांच्या एकत्रित गीत गायनाचा असलेला जागतिक विक्रम विद्यापीठाने मोडून तब्बल १५,४०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नवा विक्रम प्रस्थापित केला.
                       गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी इमा ब्रेन यांनी यावेळी विद्यापीठाने केलेल्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्यासह आयोजन समितीला वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण चार विश्वविक्रमाची नोंद केली.

– महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य –

नागपूर पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी कार्यक्रम

 

0
0

Leave a Reply

Realted News