♦ तलाठ्याच्या मदतीने शेतकऱ्यावर कारवाई टाळण्यासाठी दोन लाख २० हजार रुपयांची लाच
♦ लाचखोर तहसीलदार अभय गायकवाड पोलिस कोठडीत, तलाठी सचिन पुकळे हा फरार
चंद्रपूर : तलाठ्याच्या मदतीने शेतकऱ्यावर कारवाई टाळण्यासाठी दोन लाख २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड याला बुधवारी न्यायधीशांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर फरार तलाठी सचिन पुकळे याच्या शोधात पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.
तक्रारदार कवडजई शिवारात शेतजमीनतील मुरुम काढण्याचे काम करत होते. मात्र, मुरुम खननाची परवानगी नसल्याने बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड व कवडजई येथील तलाठी सचिन पुकळे यांनी कारवाई टाळण्यासाठी २ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने १ लाख १९ हजार ९०० रुपये त्यांना दिले. तरीसुद्धा ते उर्वरित रकमेसाठी तगादा लावत होते.
याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून तहसीलदार अभय गायकवाड याला मंगळवारी ताब्यात घेतले होते, तर तलाठी सचिन पुकळे हा फरार असून, त्याच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहेत.
पुण्याच्या घराची होणार झाडाझडती
बल्लारपूर तहसीलदार गायकवाड याच्या घराची चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने झाडाझडती घेतली. दरम्यान, पुणे येथे त्याचे घर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पुणे पोलिसांना त्याच्या घराची झाडाझडती घेण्याचे सांगितले असल्याची माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांनी दिली आहे.
चंद्रपूर लाचलुचपत विभागाने तहसीलदार गायकवाडला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.