आरोग्य सहायकाच्या थकीत वेतनाच्या बिलासाठी सव्वा लाखांची मागणी
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. एका आरोग्य सहायकाच्या थकीत वेतनाचे पुरवणी देयक मंजूर करण्यासाठी त्यांनी सव्वा लाख रुपयांची लाच मागितली होती.
आरोग्य सहायकाचे फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२४ आणि नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी डॉ. भोकरे यांचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी २ मार्च रोजी दीड लाख रुपयांची मागणी केली. पीडित आरोग्य सहायकाने एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने २५ मार्चला लाच मागणीची पडताळणी केली. डॉ. भोकरे यांनी तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. २६ मार्चला रचलेल्या सापळ्यात ते अडकले. लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी डॉ. भोकरे यांनी आजारी असतानाही हाताला सलाईन लावून रुग्णसेवा केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. हा भाग नक्षलप्रभावित असल्याने त्यांना गडचिरोली पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.