जरांगे पाटलांना आमचा ठाम पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी मुस्लीम समाज रस्त्यावर उतरेल– इम्तियाज जलील
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना मैदान रिकामे करण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी दिली असतानाच, एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. जर पोलिसांनी बळजबरी केली, तर मुस्लीम समाज ‘छातीचा कोट’ बनून जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहील, असा इशारा जलील यांनी दिला आहे.
आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, मनोज जरांगे यांना एमआयएमचा पाठिंबा आहे. जर सरकार किंवा पोलिसांनी बळजबरी केली, तर मराठा समाज जितक्या ताकदीने रस्त्यावर उतरेल, तितक्याच ताकदीने मुस्लीम समाजही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील.
सरकारला आंदोलनाची भीती का वाटते?
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असे सांगत जलील यांनी सरकारवर निशाणा साधला. हरियाणा, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन चाललं. शाहीनबागचे आंदोलनही महिनोंमहिने सुरू होते. मग महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनाची सरकारला एवढी भीती का वाटते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फक्त पाच दिवसांत नोटीस देऊन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न होतोय. हे लोकशाही आहे, हुकूमशाही नव्हे, असेही ते म्हणाले.
‘मराठा आमदार-खासदारांनी राजीनामे द्यावेत
मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींवर ही जलील यांनी टीका केली. जरांगे पाटलांच्या मागे रस्त्यावर जे सामान्य मराठा बांधव आहेत, ते खेड्यापाड्यांमधून आले आहेत. पण त्यांना निवडून देणारे आमदार-खासदार मात्र एसीमध्ये झोपलेत. जरांगे पाटलांनी त्यांना उचलून आणावे आणि त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
तुम्हाला आरक्षण मिळालं, तर आमच्यासोबत उभे रहा
यावेळी इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. हायकोर्टाने मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण दिले होते. आम्ही आज तुमच्यासाठी एकजुटीने उभे आहोत. उद्या आम्ही आमच्या 5 टक्के आरक्षणासाठी लढाई लढू, तेव्हा तुम्हीही आमच्या मागे उभे राहा,” अशी अपेक्षा त्यांनी मनोज जरांगे पाटलांकडून व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारची शिष्टाई सफल, मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. यामुळे गत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सुटला आहे.