वडिलांच्या स्वप्नासाठी अश्रूंवर मात : जान्हवीची जिद्द संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणा
भंडारा : आयुष्य कितीही कठीण वळणावर उभे राहिले, तरी स्वप्नांची मशाल हातातून सुटू देऊ नये, याचे जिवंत उदाहरण भंडारा जिल्ह्यातील जान्हवी हौशीलाल राहांगडाले हिने समाजासमोर ठेवले आहे. घरात वडिलांचे पार्थिव असतानाही बारावीची परीक्षा देत जान्हवीने धैर्य, जिद्द आणि कर्तव्यभावनेचा आदर्श घडवला आहे.
तुमसर तालुक्यातील आंबागड येथील रहिवासी हौशीलाल राहांगडाले (५१) यांचे सोमवारी दुपारी दुर्दैवी अपघातात निधन झाले. कुटुंबाचा आधारस्तंभ अचानक कोसळल्याने संपूर्ण राहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या दुःखावर मात करत जान्हवीने आपल्या वडिलांच्या स्वप्नांना प्राधान्य दिले.
मंगळवारी बारावी बोर्ड परीक्षेचा पहिलाच दिवस होता. इंग्रजी विषयाचा पेपर आणि घरात वडिलांचे अंत्यदर्शन — असा असह्य संघर्ष जान्हवीसमोर उभा होता. तरीही, “वडिलांना मी शिकलेली पाहायची होती” या एका विचाराने तिने स्वतःला सावरले आणि परीक्षा केंद्र गाठले.
तुमसर येथील जनता विद्यालयात जान्हवी परीक्षा केंद्रावर पोहोचताच भावनिक वातावरण निर्माण झाले. तिची अवस्था पाहून शिक्षकही हेलावले. मुख्याध्यापक पंकज बोरकर व केंद्र संचालक प्रा. नीलकंठ कापगते यांनी तिला धीर दिला. डोळ्यांत अश्रू असूनही, मनात जिद्द घेऊन जान्हवीने इंग्रजीचा पेपर पूर्ण केला.
“वडिलांचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येत होता. पण त्यांना माझे शिक्षण अपूर्ण राहू नये असे वाटायचे. म्हणून मी परीक्षा दिली,” असे भावनिक शब्द जान्हवीने व्यक्त केले.
परीक्षा संपताच ती तात्काळ गावी परतली आणि त्यानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही दररोज आठ किलोमीटरचा प्रवास करून शिक्षण घेतलेल्या जान्हवीची ही जिद्द आज संपूर्ण आंबागड गावासाठीच नव्हे, तर समाजासाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
दुःखाच्या अंधारातही शिक्षणाचा दीप उजळवत ठेवणारी जान्हवी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.









Users Today : 6
Users Yesterday : 30
Views Today : 6
Who's Online : 0