February 7, 2026 8:38 am

वन विभागाचे मुख्यालय नागपुरातून हलवण्यास तीव्र विरोध

वन विभागाचे मुख्यालय नागपुरातून हलवण्यास तीव्र विरोध :
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे व्हेरायटी चौकात जोरदार निदर्शने

नागपूर : वन विभागाचे मुख्यालय नागपूरमधून मुंबई किंवा इतरत्र हलवण्याच्या सरकारच्या कथित हालचालींना विरोध म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्हेरायटी चौकात आज जोरदार आंदोलन केले. नागपूर हेच वन विभागाचे नैसर्गिक आणि ऐतिहासिक केंद्र असल्याने मुख्यालय हलवण्याचा कोणताही निर्णय अन्यायकारक ठरेल, अशी आंदोलकांची भूमिका होती.

आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, महाराष्ट्र सरकार वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपुरातून मुंबईला हलवण्याचा प्रयत्न करत आहे, जे संपूर्ण विदर्भाच्या हितावर घाला आहे. राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र विदर्भात असताना मुख्यालय राजधानीत नेणे म्हणजे जनतेच्या हक्कांवर गदा असल्याचे त्यांनी म्हटले.

नागपूर करारानुसार हे मुख्यालय नागपुरातच राहणे बंधनकारक असून, वर्षानुवर्षे विदर्भातील जनतेने वन संवर्धनात मोठे योगदान दिले आहे. अशा परिस्थितीत मुख्यालय हलवणे हा विदर्भावर “घोर अन्याय” असे आंदोलनकर्ते म्हणाले.

या विषयावर विदर्भ राज्य आंदोलन समितीने मागील महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन दिले होते. तसेच, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. परंतु कोणतेही उत्तर न मिळाल्याने समितीने आक्रमक पवित्रा घेत आजचे आंदोलन छेडले.

निदर्शनादरम्यान आंदोलकांनी—
‘वन विभागाचे मुख्यालय आमच्या हक्काचे’, ‘काही देऊ शकत नाही तर हिसका तरी देऊ नका’, ‘विदर्भाचे हक्क काढून घेऊ नका’, ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’—अशा प्रभावी घोषणा देत सरकारविरोधात संतप्त आवाज उठवला.

विदर्भातील सर्वपक्षीय संघटनांनी या हालचालींचा गांभीर्याने विचार करावा आणि नागपूरमधील वन विभागाचे मुख्यालय कायम ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

0
0

Leave a Reply

Realted News